
Solapur : 'देव'माळावरच्या कादंबरीचा कॅन्सरशी संघर्ष; दानशुरांनी 'दातृत्वा' ची ओंजळ करावी रिकामी !
मोडनिंब : शेटफळ तालुका मोहोळ येथील अभिमान जाधव यांची मुलगी कादंबरी. चिमुरडीचे वय अवघे सहा वर्षाचे. सहा महिन्यापूर्वी आजारी पडल्यानंतर तिला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले. सलग सहा महिने ती या आजाराशी झुंजत आहे. सतत सहा महिन्यांच्या केमोथेरेपीने तिच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणाही होत आहे. मात्र आता तिला पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची खूपच गरज आहे.
शेटफळ येथील देवमाळावर राहणारे अभिमान व त्यांची पत्नी वर्षा मोलमजुरी करून जगतात. घरात दोन छोटी मुलं व वयोवृद्ध वडील. घरी थोडीफार शेती होती. ती पण चार वर्षांपूर्वी आईच्या आजारात कर्जात अडकलेली. यातच कादंबरीला कॅन्सर असल्याचे निदान झाले. केईएम हॉस्पिटल, पुणे येथील डॉक्टरांनी कादंबरी बरी होईल परंतु तिच्या संपूर्ण उपचारासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च होईल असे सांगितले. बाळाच्या जीवाची होणारी तगमग अभिमान यांना स्वस्थ बसू देईना. काहीही करून कादंबरीला वाचवायचेच या निर्धाराने ते गावी परतले.
अनेक ठिकाणी विनवण्या करून थोडीफार मदत मिळाली. मोडनिंब येथील कैलास काटकर यांनी भागवत पाटील या मूळ अरण येथील असलेल्या त्यांच्या मित्राची ओळख करून दिली. भागवत पाटील यांच्या ठाण्यातील 'आयुष्यत ट्रस्ट' या संस्थेने जवळपास सव्वा लाख रुपयाची मदत केली. साई संस्थान शिर्डी यांच्याकडून 50 हजार रुपये, मोडनिंब येथील लोकनाट्य कला केंद्रातील महिला कलाकार, मोडनिंब सराफ असोसिएशन यांनीही थोडीफार आर्थिक मदत केली.
कादंबरी आता बरी होते आहे परंतु, आणखी पाच ते सहा महिने उपचार घ्यावे लागणार आहेत. यासाठी अभिमान यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. शेटफळ च्या देवमाळावर राहणाऱ्या, कादंबरीच्या जगण्याच्या उर्मिला बळ देणाऱ्या अभिमान ला माणसातल्या देवत्वावर प्रचंड विश्वास आहे. त्याच बळावर बापलेक लढत आहेत.
तुळस जपायला हवी -
अभिमान यांच्या घरी गेल्यानंतर दर्शनी भागात तुळशी वृंदावन लक्ष वेधून घेते. अभिमान यांच्या पत्नी वर्षा यांनी बनवलेले तुळशीवृंदावनच त्यांच्या संसाराची कहाणी सांगून जाते. शेण मातीच्या केलेल्या ओट्यावर पाईप उभा करून त्यावर ठेवलेली कुंडी व त्यात बहरलेले तुळशीचे रोपट, फाटक्या संसारातही तुळस जपायलाच हवी याची साक्ष देते.
कादंबरी च्या मदतीसाठी
अविष्यत ट्रस्ट, ठाणे
अकाउंट नंबर : 056405004691
बँक : आय सी आय सी आय बँक महापे शाखा
आय एफ एस सी कोड : ICIC0000564
शिवाजी भोसले उपसंपादक, सकाळ सोलापूर