bus stand
bus standsakal

सोलापूर : गजबजलेल्या बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर!

चोरीच्या घटनांमध्ये वाढ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्याने कार्यालयासह गजबजलेल्या बसस्थानकाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. सध्या लग्नसराई आणि उन्हाळी सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. दिवसेंदिवस पाकीट, महिलांचे पर्स व दागिन्यांची चोरी अशा घटना वाढल्याने पोलिस आणि एसटीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

बसस्थानकामध्ये महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘विशेष पोलिस चौकी’ उभारली आहे. मात्र, या चौकीत एकही पोलिस कर्मचारी नसल्याचे बुधवारी करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले. बेवारस स्थितीत पडलेल्या बॅगा, अस्ताव्यस्त पडलेले सामान असे चित्र येथे दिसून आले. चौकीजवळच खासगी बसचालक प्रवाशांना ‘पुण्याला येणार का, औरंगाबादला जायचे का’ असे विचारत एसटीच्या प्रवाशांना खासगी वाहतुकीकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. एकंदरीतच, ऐन गर्दीतसुद्धा येथे आवश्यक असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ना पोलिसांमध्ये गांभीर्य दिसून आले, ना एसटी महामंडळाला. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच स्थिती येथे दिसून आली. सुरक्षा व्यवस्थेतील अशा बेपर्वाईमुळे बसस्थानकात यापूर्वी अनेकदा चोरीच्या, प्रवाशांना मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिस चौकी आहे, पण पोलिसच गायब असल्यामुळे भुरट्या चोरांना व पाकीटमारांना सुगीचे दिवस आले आहेत. कोणीही सहजपणे येऊन कुठलीही धोकादायक वस्तू स्थानकात ठेवून निघून जाऊ शकतो. बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारीदेखील स्थानकावर पाहणी, तपासणी करताना कधीही दिसून येत नाहीत. त्यामुळे बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोलापूर बसस्थानक परिसरातील हा लाइव्ह रिपोर्ट.

दुपारी ११ वाजता उन्हाळी सुटी, लग्नसराई असल्याने शहरातील मध्यवर्ती बस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे पाकीट, पर्सची चोरी करतात; मात्र योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळून आले. दुपारी १२ वाजता ‘सकाळ'च्या प्रतिनिधीने पाहणी केली. यावेळी अनेक प्रवासी मोठ्या लगेजसह बस स्थानकातून ये-जा करत होते. मात्र, एकाही प्रवाशाची कुठलीही तपासणी केली जात नव्हती. विशेष म्हणजे महिला सहाय्यता केंद्रात एकही पोलिस कर्मचारी हजर नव्हता. राज्य परिवहन महामंडळातर्फे दर तासाला ‘बेवारस वस्तूंना हात लावू नये, पाकीटमार व चोरांपासून सावध राहावे’ अशी उद्‌घोषणा केली जात होती. मात्र, केवळ टेप वाजवून आपली जबाबदारी संपते, असाच जणू महामंडळ प्रशासनाला वाटत असावे, अशी परिस्थिती होती. निदान लग्नसराई, गर्दीचा हंगाम, सणासुदीच्या काळात तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. दुपारी १२.३० च्या सुमारास खासगी बस कंपन्यांचे एजंट स्थानकात आले. ‘पुण्याला येणार का, औरंगाबादला, नागपूर, मुंबईला जायचे का’ अशी विचारणा प्रवाशांकडे करीत होते. तब्बल दोन तासांच्या पाहणीत सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकात एकही महिला किंवा पुरुष पोलिस कर्मचारी दिसून आला नाही, हे विशेष.

तपासणीसाठी डिटेक्टर यंत्र बसवणे गरजेचे

दररोज हजारो प्रवासी बसस्थानकात ये-जा करीत असतात. या ठिकाणी वस्तूंची तपासणी होण्यासाठी डिटेक्टर यंत्राची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर खासगी एजंटांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

- शनेश्वर पवार, प्रवासी

महिला केंद्रात पोलिस आवश्यक

निदान गर्दीच्या कालावधीत तरी सुरक्षेच्या उपाययोजना वाढविणे गरजेचे आहे. पर्स, पाकीट चोरीच्या वाढत्या घटना पाहता सुरक्षेसाठी येथील महिला केंद्रात महिला पोलिसांनी थांबणे गरजेचे आहे.

संध्या लादे, प्रवासी

ठळक बाबी.....

  • - दोन दिवसांत चोरीच्या आठ घटना

  • - चोरीच्या घटनांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीती

  • - पोलिस, एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

  • - केवळ १७ सीसीटीव्ही कॅमेरे

  • - यातील २ सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com