Solapur : पीडितेच्या अपहरण प्रकरणी आरोपीस दोन वर्षे सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

forced labor

Solapur : पीडितेच्या अपहरण प्रकरणी आरोपीस दोन वर्षे सक्तमजुरी

सोलापूर : घरी कोणी नसल्याची संधी साधून आरोपी कोडग्या हरकून काळे (रा. मोहोळ) याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. पीडितेच्या आईने कोडग्या काळेविरुद्ध मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपीला दोन वर्षे दहा महिने १४ दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

दरम्यान, पीडितेची आई शेळ्या चारायला गेल्यानंतर ती घरी एकटीच होती. त्यावेळी कोडग्या पीडितेच्या घरी आला आणि लग्नाचे आमिष देऊन तिला घेऊन गेला. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली.

विवाहाच्या आमिषातून मुलीला पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्ती केली, असे फिर्यादीत नमूद होते. संशयित आरोपी फरार असल्याने पोलिसांनी सीआरपीसी २९९ अंतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पण, आरोपी हा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी पुन्हा पुरवणी दोषारोपपत्र पाठवले.

या प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची आई, पंच, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे पीडितेने सरकारी पक्षाला मदत केली नाही. दरम्यान, आरोपीने गोड बोलून, फूस लावून, विवाहाचे आमिष दाखवून त्याच्या गाडीवरून पळवून नेल्याच्या युक्तिवाद साक्षी-पुराव्याद्वारे सहायक सरकारी वकील प्रकाश जन्नू यांनी केला.

तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कोडग्या काळे याला भादंवि कलम ३६३ प्रमाणे दोषी धरून आजपर्यंत भोगलेला तुरुंगवास म्हणजे दोन वर्षे १० महिने १४ दिवसांची शिक्षा दिली. पाच हजार रुपयांच्या दंडाचीही शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद, अशीही शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारतर्फे ॲड. जन्नू यांनी तर आरोपीतर्फे ॲड. बायस यांनी काम पाहिले.