दोनशे क्षमतेच्या तुरुंगात ५०० कैदी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Central Jail overcrowded

दोनशे क्षमतेच्या तुरुंगात ५०० कैदी!

सोलापूर - येथील मध्यवर्ती कारागृहाची क्षमता अवघी २०० कैदी बसतील एवढीच आहे. तरीदेखील जागेअभावी त्या ठिकाणी तब्बल ५०० कैदी ठेवण्यात आले आहेत. जुन्या तुरुंगालगत नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. परंतु, मागील तीन-साडेतीन वर्षांपासून काम अर्ध्यावरच थांबले आहे.

सोलापूर शहर-ग्रामीणमधील विविध गुन्ह्यांतील आरोपी सध्या शहरातील मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. त्यात अत्याचार, खून, हाणामारी, विनयभंग अशा प्रकरणातील कैद्यांची संख्या अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने शहरातील मध्यवर्ती कारागृह तुडूंब भरल्याचे चित्र आहे. कैद्यांच्या दाटीमुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुरुंगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कैद्यांची सोय दुसरीकडे करण्यात आली होती.

कोरोना काळात कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही कैद्यांना तात्पुरते सोडून दिले होते. आता तेही पुन्हा तुरुंगात परतले आहेत. मध्यवर्ती कारागृहातील पाच बराकीत कैद्यांची संख्या प्रचंड झाल्याची स्थिती आहे. राज्यातील बहुतेक तुरुंगामधील स्थिती तशीच आहे. त्यामुळे ज्यादा झालेले कैदी इतरत्र हलविताही येत नाहीत. सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील जुन्या इमारतीची क्षमता २०० कैद्यांची आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून त्या इमारतीजवळ दुसरी इमारत बांधली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ते काम केले जात आहे. मात्र, एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी अजून लागणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठवूनही अजूनपर्यंत निधी मिळू शकलेला नाही. त्यामुळे निधी मिळून काम पूर्ण होईपर्यंत तुरुंगातील कैद्यांना दाटीवाटीतच राहावे लागणार आहे.

मध्यवर्ती कारागृहाची स्थिती

  • कैद्यांची क्षमता २००

  • सध्याचे कैदी ५००

  • नवीन इमारतीची क्षमता २४०

  • इमारतीच्या उर्वरित कामांसाठी निधी १.२८ कोटी

Web Title: Solapur Central Jail Overcrowded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..