
सोलापूर : सर्व्हर डाउनमुळे नागरिकांची तब्येत डाउन!
सोलापूर : प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट ओळख देण्याच्या उद्देशाने २००९ मध्ये ‘आधार योजना’ अंमलात आली. मात्र, बारा वर्षे उलटूनही नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी, तर कधी आधार दुरुस्तीसाठी फिरावे लागत आहे. ज्या चुका प्रशासकीय यंत्रणेने केल्या आहेत, त्यांच्या दुरुस्तीचा अनावश्यक खर्च आता नागरिकांच्या माथी मारला जात असल्याने अनेकांनी आधार कार्ड अपडेट केल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च असते. आता नागरिकांना सर्व्हर डाउनमुळे रांगेत थांबून तब्येत डाउन करून घेण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
शासकीय कामे, बँकांशी संबंधित कामे, आर्थिक व्यवहार, सरकारी योजना, नोकरी- व्यवसाय, व्यापार आणि खरेदी-विक्री, नवविवाहितेच्या नावातील दुरुस्ती, पत्त्याचा बदल, अंगठ्याच्या ठशांचे नूतनीकरण व इतर सर्व कामांसाठी आधार ओळखपत्र आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचे डाक विभाग, तहसील कार्यालय, महसूल मंडळे, इतर प्रशासकीय कार्यालये, सेतू आणि बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी अभियाने मोठ्या प्रमाणावर राबविली आहेत.
परंतु माहिती नोंद करताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या. त्या तांत्रिक म्हणता येतील, परंतु सर्व काही व्यवस्थित असतानादेखील फक्त डाटा संग्रह करताना चुकीची माहिती भरल्याने अनेकांच्या आधार कार्डची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. प्रशासकीय यंत्रणेने त्याच वेळेस योग्य पद्धतीने माहिती संकलन आणि नोंदणी केली असती तर आज नागरिकांना आपला वेळ व अनावश्यक भुर्दंड सहन करावा लागला नसता. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. प्रशासनाने नेमलेल्या यंत्रणेच्या आधार दुरुस्ती केंद्रावर आजही दुरुस्तीसाठी मोठी गर्दी होत आहे.
ही दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांकडून १०० रुपये आकारले जातात. हा भुर्दंड नागरिकांना अनावश्यक सोसावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आधार कार्ड दुरुस्तीसाठी आधार केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत. नागरिकांना आपला वेळ व अनावश्यक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी आणि राजकीय मंडळींनी प्रत्येक प्रभागात कॅम्प घेणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागात सुरू करावेत केंद्र
ग्रामीण भागात शेती व मजुरी व्यवसाय आहे. त्यामुळे नागरिकांना आधार दुरुस्तीसाठी आपले काम सोडून शहराच्या किंवा मोठ्या खेड्यांच्या ठिकाणी जावे लागते. दररोज मोठ्या रांगा लावाव्या लागतात. काम न झाल्याने पुन्हा परत जावे लागते, तर कधी सर्व्हर डाउनमुळे तासन्तास थांबावे लागते. नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात आधार केंद्र सुरू केले तर ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि नागरिकांच्या अडचणीही दूर होतील.
या ठिकाणी आहेत आधार केंद्र
सोलापूर शहरातील अशोक चौक, दाजी पेठ, गुरुनानक नगर, इंदिरानगर, मंगळवार पेठ, मेडिकल कॉलेज, एमआयडीसी सोलापूर, नवी पेठ, शिवशाही, सिद्धेश्वर पेठ, काळी मस्जिद, सोलापूर मार्केट, सोलापूर पोस्ट हेड ऑफिस. तर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, मंद्रूप, मोहोळ, नान्नज, पांगरी, वैराग येथे आधार केंद्र आहेत.सोलापूर शहरातील अशोक चौक, दाजी पेठ, गुरुनानक नगर, इंदिरानगर, मंगळवार पेठ, मेडिकल कॉलेज, एमआयडीसी सोलापूर, नवी पेठ, शिवशाही, सिद्धेश्वर पेठ, काळी मस्जिद, सोलापूर मार्केट, सोलापूर पोस्ट हेड ऑफिस. तर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, मंद्रूप, मोहोळ, नान्नज, पांगरी, वैराग येथे आधार केंद्र आहेत.
Web Title: Solapur Citizens Down Due To Server Down
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..