esakal | पंढरपूर तालुका होतोय हॉटस्पॉट ! जिल्ह्यात आज आढळले 1479 रुग्ण; 24 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

पंढरपूर तालुका होतोय हॉटस्पॉट ! जिल्ह्यात आज आढळले 1479 रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील 12 हजार 871 पुरुषांना तर आठ हजार 675 महिलांना तर ग्रामीणमधील 36 हजार 289 पुरुषांना आणि 22 हजार 21 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज शहरात 257 रुग्णांची वाढ झाली असून पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात आज एक हजार 222 रुग्ण वाढले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील तीनशे तर ग्रामीणमधील 991 रुग्णांनी कोरोनावर मात करीत आज घर गाठले.

शहर-जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 80 हजारांकडे वाटचाल करू लागली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णांचा आलेख वाढत असून मृत्यूही वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज अक्‍कलकोट व माढा तालुक्‍यातील प्रत्येकी तीन, बार्शी, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येकी दोन तर पंढरपूर तालुक्‍यातील सर्वाधिक चार तर सांगोल्यातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत शहरातील 896 तर ग्रामीणमधील एक हजार 398 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पंढरपूरकरांनो, लक्षणे असल्यास तत्काळ उपचार घ्या

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या गर्दीच्या सभा झाल्या आहेत. दरम्यान, आता पंढरपूर तालुक्‍यातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आज पंढरपूर तालुक्‍यात 191 रुग्ण आढळले असून चारजणांचा मृत्यू झाला आहे. निवडणुकीनंतर पंढरपूर तालुक्‍यात रुग्ण खूप वाढतील, अशी शक्‍यता प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली होती. त्याचा प्रत्यय हळूहळू येत आहे. दरम्यान, लक्षणे असलेल्या व्यक्‍तींनी आजार अंगावर न काढता तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, कोरोना टेस्ट करून घ्यावी, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हाताची स्वच्छता राखावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक बाबी...

  • शहरात आज 257 रुग्ण वाढले असून पाचजणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू

  • ग्रामीण भागात आज आढळले दोन हजार 222 नवे रुग्ण; 19 जणांचा कोरोनाने घेतला बळी

  • आज एकूण एक हजार 479 रुग्णांची वाढ तर 24 जणांचा मृत्यू; आज 1291 रुग्ण बरे होऊन परतले घरी

  • पंढरपूर तालुक्‍यात 191 रुग्ण; चार रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

  • माढ्यात 247, बार्शीत 180 तर माळशिरसमध्ये वाढले 250 रुग्ण; तीन तालुक्‍यात सातजणांचा मृत्यू

  • शहरातील जुळे सोलापूर परिसरात 25 तर विजयपूर रोड परिसरात आढळले 18 रुग्ण

  • शहराची एकूण रुग्णसंख्या 21 हजार 546 तर ग्रामीणची रुग्णसंख्या 58 हजार 310