esakal | लॉकडाउनमुळे वाढल्या अडचणी ! खासगी सावकारांवर पोलिस ठेवणार "वॉच'
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी सावकारी

लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगी सावकारीला ऊत येईल, अशी शक्‍यता आहे.

लॉकडाउनमुळे वाढल्या अडचणी ! खासगी सावकारांवर पोलिस ठेवणार "वॉच'

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आता ओसरू लागली असून 1 जूननंतर लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध शिथिल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु, एप्रिल 2020 ते मे 2021 या काळात वारंवार निर्बंध लागू केल्याने व्यापारी, लहान- मोठ्या व्यावसायिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. सर्वसामान्यांसमोरही अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगी सावकारीला (Private lenders) ऊत येईल, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे खासगी सावकारांबद्दल कोणी तक्रार केली, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी दिला आहे. (Solapur city police is keeping an eye on private lenders)

हेही वाचा: होम आयसोलेशनमधील "तो' रुग्ण सापडलाच नाही ! उपचार करणारे डॉक्‍टरांचे तोंडावर बोट

शहरात जवळपास दोनशेहून अधिक परवानाधारक खासगी सावकार आहेत. परवाना असतानाही काहीजण ज्यादा व्याजदाराने कर्ज देतात आणि त्याची सक्‍तीने वसुली करतात, अशा तक्रारी शहर उपनिबंधकांकडे येऊ लागल्या आहेत. तर परवाना नसतानाही बेकायदेशीरपणे खासगी सावकारी करणाऱ्यांची संख्याही शहरात लक्षणीय आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून काहीजणांनी आत्महत्याही केली होती. पोलिस आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली त्या खासगी सावकारांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष उघडला होता. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा खासगी सावकारी वाढेल, असा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी भविष्यात आपली फसवणूक होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

हेही वाचा: कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार ! "तो' पोलिस निलंबित

पोलिस आयुक्‍तांचा कोरोनावर "अंकुश'

कोरोनाच्या पहिल्या लाटेत झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये कोरोना वाढणार नाही, यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी लाकडी बांबू व पत्रे लावून रुग्ण सापडलेला भाग काही दिवसांसाठी सील करण्यात आला. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या या संकल्पनेची तत्कालीन विभागीय आयुक्‍तांनी कौतुक करीत पुण्यातही तसाच प्रयोग राबविण्यात आला. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोबाइल पेट्रोलिंग, ज्या भागात लोकांची गर्दी होते अशा परिसराची यादी तयार करून त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली. प्रभागनिहाय कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केल्यानंतर नगरसेवकांमध्ये प्रभाग कोरोनामुक्‍त करण्यासाठी स्पर्धा लागेल ही देखील संकल्पना त्यांचीच होती. बाजार समिती असो वा गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढविल्या. तर आता जेवढे रुग्ण वाढतील, त्यांची हिस्ट्री तपासून त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. पोलिस आयुक्‍तांच्या या सर्व संकल्पनांचा फायदा झाला आणि कोरोना वाढीचा अनेक तज्ज्ञांनी व्यक्‍त केलेला अंदाज खोटा ठरवून दाखविला.