esakal | Solapur: घोषणा स्वबळाची; तयारी शुन्य
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

घोषणा स्वबळाची; तयारी शुन्य

sakal_logo
By
हुकूम मुलाणी ​

गत आठवड्यात सोलापूर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात मंगळवेढ्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी मंगळवेढा नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. मात्र, काही महिन्यावर येवून ठेपलेल्या निवडणुकीबाबतच्या तयारीचे काय? असा प्रश्न केला असता तयारी शुन्य असल्याचे चित्र आहे.

गत नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार स्व. भारत भालके व राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांच्या पुढाकारातून नगरपालिकेवर काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात युती झाल्याने जवळपास १२ जागा या दोन्ही पक्षांनी जिंकल्या होत्या. साडेचार वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्व. भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात असली तरी राजकीय सत्तेच्या चाव्या स्व. भारत भालके यांच्या हातात राहिल्या होत्या. परंतु, भालके यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा राखता आली नाही. तसेच स्व. भालकेच्या पश्‍चात पहिल्या नगरपालिका निवडणुकीत सामोरे जाणे हे देखील राष्ट्रवादीसाठी आव्हान आहे.

हेही वाचा: विकासाची स्वप्ने गाजराची पुंगी ना ठरो..!

दरम्यान, गत आठवड्यात सोलापूर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात मंगळवेढ्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा दावा केला. पण मंगळवेढा शहरात काँग्रेसचा गट मजबूत होण्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणेचा अभाव आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांनी आतापर्यंत तालुक्‍यातील प्रमुख प्रश्नांमध्ये लक्ष घातलेले दिसत नाही. खासदारकीबरोबर आमदारकीची जागा पटकाविण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपच्या स्थानिक दोन आमदारांसमोर टिकाव धरण्यासाठी काँग्रेसला मजबूत पक्षसंघटना आवश्‍यक आहे. काँग्रेसचे सोलापुरात दिलेली स्वबळाची घोषणा मंगळवेढा शहरासाठी बडा घर पोकळ वासा ठरू नये, अशी अपेक्षा निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होते. त्यामुळे घोषणेबरोबर आगामी काळातील तयारीदेखील निर्णायक ठरणार आहे

- हुकूम मुलाणी

loading image
go to top