
सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात एकही जागा मिळू शकली नाही. उलट काँग्रेसचे दिग्गज नेते इतर पक्षात गेल्याने अडचणी वाढल्या आहेत. यामुळे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांवर विसंबून राहावे लागणार आहे. सध्या जे नेते काँग्रेसमध्ये आहेत, तेसुद्धा सक्रिय नसल्याने नव्याने पक्ष बांधणीसह संघटना मजबूत करण्याचे आव्हान नवे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासमोर असणार आहे.