
Solapur : चालू गळीत हंगामात ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या शेतकरी संघटनांचा एल्गार
मोहोळ : सोलापूर जिल्हा हा सर्वात जास्त ऊस पिकविणारा जिल्हा आहे, परंतु ऊस दरात सर्वात मागे असलेला जिल्हा आहे. विविध शेतकरी संघटना कारखानदारा विरोधात वर्षानुवर्षे संघर्ष करतात, मात्र कारखानदार त्याला न जुमानता उसाला प्रति टन 2200 ते 2300 च्या वर दर देत नाहीत. उसासाठी लागणाऱ्या रासायनिक खताचे तसेच मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यासाठी चालू गळीत हंगामात उसाला पहिली उचल किमान 3 हजार रुपये द्यावी, आपल्यापेक्षा मराठवाड्यात ऊस दर जादा आहे.
कारखानदारांची ही मनमानी थांबविण्या साठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येत्या 23 तारखेला पंढरपूर येथील होणाऱ्या ऊस परिषदेस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन ऊस दर संघर्ष समितीचे सचिन पाटील यांनी केले.पंढरपूर येथील शिवतीर्थावर येत्या 23 तारखेला ऊस परिषदेचे आयोजन केले आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यात जनजागृती करण्यासाठी आयोजित बैठकीत पाटील बोलत होते.
यावेळी रयत क्रांतीचे दीपक भोसले, सोमेश क्षीरसागर, पप्पू पाटील, माऊली हळणवर, समाधान बागल,अतुल खूपसे, छगन पवार, राजेंद्र लांडे, बाळासाहेब बोबडे, गणेश जाधव, शशिकांत थोरात, अमोल पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब वाघमोडे, हनुमंत गिरी, रंजना पाटील, रमेश भोसले, श्रीमती दगडे यांच्यासह विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी दीपक भोसले म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व घामाच्या दामासाठी पक्ष, संघटना, आपसातील मतभेद बाजूला ठेवा व शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन लढ्यात या सामील व्हावे. यावेळी स्वाभिमानीचे उपजिल्हाध्यक्ष पप्पू पाटील म्हणाले, उद्यापासून गाव भेट दौरे काढून शेतकऱ्यात ऊस परिषदे बाबत जनजागृती करण्यात येणार आहे, जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी ऊस परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अतुल खूपसे यांनी मनोगत व्यक्त केले.