सोलापूर : मुलगी आणि वडील झाले एकाच वेळी बारावी उत्तीर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 कु. साक्षी सरडे  & वडील शिवाजी सरडे

सोलापूर : मुलगी आणि वडील झाले एकाच वेळी बारावी उत्तीर्ण

वांगी : बारावीचा निकाल लागला. सगळीकडे पालक आपल्या मुलांना बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करत होते. परंतु कविटगाव (ता. करमाळा) येथील कु. साक्षी सरडे ही आपल्या वडिलांना व वडील शिवाजी सरडे साक्षीचे अभिनंदन करीत होते. त्‍याला कारणही तसेच होते. शिवाजी सरडे व साक्षी शिवाजी सरडे दोघेही एकाच वेळेस बारावी उत्तीर्ण झाले होते. त्‍यामुळे बापलेकीसह ग्रामस्‍थांच्‍याही आनंदाला पारावार उरला नव्‍हता.

कविटगाव येथील शिवाजी सरडे यांनी चाळीशीनंतरही १७ नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा दिली होती. तर मुलगी साक्षीनेही बारावीची परीक्षा दिली होती. निकालादिवशी म्‍हणजे आज (ता. ८) बाप आणि लेकीला निकालाची उत्‍सुकता लागून होती. एरवी आपल्‍या पाल्‍याच्‍या निकालाची उत्‍सुकता, काळजी पालकांना असते. पण कविटगावातील चित्र थोडे वेगळे होते. इथे पालकांना आणि पाल्‍यालाही आपल्‍या निकालाची धाकधूक होती. मुलीची खात्री असल्‍याने दुपारी वेबसाईटवर पहिल्‍यांदा वडिलांनी आपला स्‍वत:चा निकाल पाहिला. उत्तीर्ण झाल्‍याचे समजताच मुलीचा निकाल पाहिला. मुलगीही चांगल्‍या गुणांनी उत्तीर्ण झाल्‍याने बापलेकीने एकमेकांना घट्ट मिठी मारली.

पण बारावीच्‍या परीक्षेत साक्षीने वडिलांवर गुणानुक्रमे मात केली. साक्षीला ८५.५० टक्के गुण मिळाले तर वडिलांना ७० टक्के. साक्षी ही अभ्यासाबरोबर चांगली खेळाडूही आहे. तिने योगामध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत तर मल्लखांबमध्ये राज्यस्तरीय पारितोषिके मिळवली आहेत. शिवाजी सरडे यांच्या पत्‍नी विद्या सरडे या कविटगावच्या सरपंच आहेत. मुलगी व पती एकाच वेळेस बारावी उत्तीर्ण झाल्यामुळे कविटगाव परिसरात या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली. शिवाय शिवाजी सरडे यांनी शिक्षणासाठी वयाची अट नसते हे देखील या निमित्ताने सिद्ध केले.

Web Title: Solapur Daughter And Father Passed 12th Same Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top