Solapur : माघी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माघी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक

Solapur : माघी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल

- राजकुमार घाडगे

पंढरपूर- माघी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीने श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट गजबजून गेले आहे. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग पाच नंबरच्या पत्रा शेड पर्यंत गेली असून श्रींच्या दर्शनासाठी सुमारे आठ तास लागत आहेत.

माघी एकादशीला जया एकादशी असेही संबोधले जाते. यावर्षी बुधवारी (ता.१) माघी एकादशी आहे. मागील वर्षी कोरोनामुळे माघी यात्रेदरम्यान काही निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे माघी यात्रेला भाविकांची अपेक्षित गर्दी झाली नव्हती. यावर्षी मात्र निर्बंध मुक्त वातावरणामध्ये माघी यात्रेचा सोहळा साजरा होत आहे.

या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. यंदा प्रथमच नवमी दिवशी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्या लगतच्या पाच नंबरच्या पत्रा शेड पर्यंत गेली होती. याबाबत बोलताना दिगंबर पांडुरंग पाटील; (रा.कसबा आरळे,ता.करवीर, जि. कोल्हापूर) म्हणाले,

आम्ही गावकरी मोठ्या संख्येने यंदा माघी यात्रेला आलो आहोत. आज पहाटे चार वाजता आम्ही तीन नंबरच्या पत्रा शेडमधील दर्शन रांगेत उभे राहिलो होतो. जवळपास आठ तासांनी दुपारी बाराच्या सुमारास आम्हाला श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. मागील वर्षी आम्हाला मुखदर्शनावरच समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र पदस्पर्श दर्शन झाल्यामुळे आनंदित आहे.

दरम्यान माघी यात्रेकरिता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, नगरपालिका व पोलीस प्रशासन भाविकांना विविध सोयी सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत झाले आहे. मंदिर समितीच्या वतीने कायमस्वरूपी चार पत्रा शेड सोडून अधिकच्या दोन पत्रा शेड उघडण्यात आले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने 65 एकर व चंद्रभागा नदी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. तर पोलीस प्रशासन देखील भाविकांच्या सुरक्षेसाठी ॲक्शन मोडमध्ये आले आहे. माघी यात्रेदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी पोलिसांचे ' हॉकर्स स्क्वाड' चे पथक तैनात करण्यात आले आहे.

हे पथक आज स्टेशन रस्ता, श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा वाळवंट परिसरामधील विक्रेत्यांना अतिक्रमण न करण्याच्या सूचना देत असल्याचे दिसून आले. दरम्यान मागील माघी यात्रेपेक्षा यंदा माघी यात्रेला भाविकांची अपेक्षित गर्दी झाल्याने चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा प्रासादिक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.