
सोलापूर : आपत्ती व्यवस्थापन विभाग होणार हायटेक
सोलापूर: आपत्ती व्यवस्थापन विभाग आता हायटेक होणार असून, आपत्तीजनक घटना प्रतिसाद प्रणाली ही यंत्रणा देशात महाराष्ट्रातच प्रथम वापरली जाणार आहे. हवामान खात्याने वारंवार यंदा जास्त पाऊस होइल, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यानुसार मॉन्सूनपूर्व तयारीसाठी पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऑनलाइनद्वारे घेतला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकरिता आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले.
ऑनलाइन बैठकीला पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, निवासी जिल्हाधिकारी शमा पवार तसेच आरोग्य विभाग, लाभक्षेत्र प्राधिकरणचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी बोटीसह साहित्य खरेदीसाठी निधी देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे मदत व पुनर्वसन विभागाकडून ऑनलाइनद्वारे झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.
जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाळ्यात पूरस्थिती असते. मागील अनुभवांनुसार पंढरपूर येथे भीमा नदीला त्याचप्रमाणे इतर ठिकाणी सीना, भोगावती- नागझरी या नद्यांना अनेकदा मोठे पूर आले असून, जीवित व वित्तहानी झाली आहे. अक्कलकोट, पंढरपूर, माढा, मोहोळ, बार्शी या तालुक्यांत अनेकवेळा पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पूरग्रस्तांना वेळेत मदत पोचविण्यासाठी पाच बोटी देण्यात आल्या आहेत. या बोटींसाठी स्थानिक नावाड्यांची मदत घेतली जाणार असून, लवकरच बोट ऑपरेटिंगबद्दल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Web Title: Solapur Disaster Management Department High Tech
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..