Solapur : माजी नगरसेवकांसह सहाजणांना सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Solapur : माजी नगरसेवकांसह सहाजणांना सक्तमजुरी

Solapur- सोलापूर पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह सहा जणांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत.

या घटनेची हकिगत अशी की, पोलिस शिपाई सुनील शंकर राठोड हे दुचाकीवर जात असताना आरोपी माजी नगरसवेक इस्माईल मत्तूलाल शेख, रियाज दस्तगीर शेख, जावेद इसाक शेख शकील महिबूब मुजावर, सर्फराज जैनोद्दीन जमादार व हुसेन दस्तगीर शेख (सर्व रा. कुमठा) या सहा जणांनी त्यांना अडवून मोटारसायकलवरून खाली पाडले.

तसेच काठीने व बेल्टने बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांच्या जवळील मोबाईल, घड्याळ व रोख रक्कम काढून घेतल्याची फिर्याद श्री. राठोड यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संजीव भोसले यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने युक्तिवादात रिकव्हरी साहित्य हे आरोपींच्या घरातून मिळाले आहेत. शिवाय मेडिकल रिपोर्टवरून फिर्यादींना मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसून येते असा युक्तिवाद मांडला.

हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सहाही आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड. दत्तात्रेय पवार यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून श्री. कोकणे, श्री. घाडगे यांनी काम पाहिले.