Solapur : एप्रिलपर्यंत सुरू होणार जिल्हा रुग्णालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

Solapur : एप्रिलपर्यंत सुरू होणार जिल्हा रुग्णालय

सोलापूर : जिल्ह्याची आरोग्यसेवा सुधारावी या हेतूने जिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फेब्रुवारीअखेरीस इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यानंतर एका महिन्यात अंतर्गत फर्निचरचे काम पूर्ण करून एप्रिल २०२३ पासून जिल्हा रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सर्वच खाटा रुग्णांनी भरलेल्या असतात. सोलापूरसह लातूर, उस्मानाबाद, बीड, इंदापूर, कर्नाटक येथील रुग्ण सर्वोपचार (सिव्हिल) रुग्णालयात उपचारासाठी येतात. ग्रामीणमधील बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची अवस्था असून नसल्यासारखीच आहे. त्या ठिकाणी मनुष्यबळ व उपचार यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे जिल्ह्याला जिल्हा रुग्णालयाची गरज होती.

चार वर्षांपूर्वी रुग्णालयाचे काम हाती घेण्यात आले होते. पण, कोरोनामुळे दोन वर्षे काम बंदच होते. आता पुन्हा कामाला गती प्राप्त झाली असून आता बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निगराणीखाली बांधकाम सुरू असून दोन महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यामातून त्या ठिकाणी वेगवेगळे डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्सेसची भरती केली जाणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला आहे.

‘डीपीसी’कडे मागितले २ कोटी

नव्याने होत असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी फर्निचरचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) दोन कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तो निधी लवकर मिळाल्यास रुग्णालयाचा शुभारंभ काही महिन्यांत शक्य होणार आहे.

महिला व बालकांची मिटेल चिंता

जिल्हा रुग्णालयात महिला व बालकांच्या प्रत्येक आजारांवर मोफत उपचार होतील. शस्त्रक्रिया, प्रसूती, सिझेरियन याची देखील सोय असेल. महिला व बालकांसाठी स्वतंत्रपणे १०० खाटा उपलब्ध असणार आहेत. दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर त्या ठिकाणी १०० खाटा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी असणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली त्याचे कामकाज पाहिले जाणार आहे.

सोलापुरातील गुरुनानक चौकात जिल्हा रुग्णालय होत असून ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. आता दीड महिन्यांत अंतर्गत फर्निचरचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागितला आहे. नवीन आर्थिक वर्षात या रुग्णालयातून रुग्णसेवा सुरु होईल.

- डॉ. प्रदीप ढेले,जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर