सोलापूर : कार्यालयाविना जिल्हा राष्ट्रवादी पोरकी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

सोलापूर : कार्यालयाविना जिल्हा राष्ट्रवादी पोरकी!

सोलापूर : एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री, एक उपमुख्यमंत्री, दोन कॅबिनेटमंत्री, पंचायतराज समितीचे चेअरमन, महामंडळाचे अध्यक्षपद, विधान परिषदेची आमदारकी राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर जिल्ह्याला दिले. सोलापूरच्या ग्रामीण भागावर तब्बल २३ वर्षांपासून अधिराज्य गाजविलेल्या जिल्हा राष्ट्रवादीला सध्या सोलापूर शहरात कार्यालय नाही. माजी आमदार दीपक साळुंखे यांची सोलापुरातील रामलाल चौकात खासगी मालमत्ता होती. येथील अपार्टमेंटमध्ये असलेल्या एका फ्लॅटवर राष्ट्रवादी भवन नावाचा लावलेला फलकही आता उतरविण्यात आला आहे. ‘राज्याच्या आणि सोलापूरच्या राजकारणात राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणणाऱ्या पक्षाला सोलापूर शहरात कार्यालय नसणे ही मोठी शोकांतिका मानली जात आहे.

सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघ अशा जिल्हास्तरावरील अनेक महत्त्वाच्या संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिलेल्या आहेत. १९९९ ते आतापर्यंत (२०२२) सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीने चार अध्यक्ष पाहिले आहेत. सुरवातीला यशवंतभाऊ पाटील, नंतर मनोहर डोंगरे, माजी आमदार दीपक साळुंखे व सध्या बळिराम साठे या चौघांनी जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सांभाळली आहे. यशवंतभाऊ पाटील यांना अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी मिळाला. २००० ते २०१५ पर्यंत तब्बल १५ वर्षे मनोहर डोंगरे जिल्हाध्यक्ष राहिले. त्या काळात सोलापुरातील शिंदे चौकातील भाड्याच्या जागेत जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यालय होते.

२०१५ मध्ये माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर रामलाल चौकातील त्यांनी खासगी फ्लॅट विकत घेत ती जागा राष्ट्रवादी भवनासाठी उपलब्ध करून दिली. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनातच येत होते. माजी आमदार साळुंखे यांनी २०१९ मध्ये जिल्हाध्यक्षपद सोडल्यानंतरही काही दिवस राष्ट्रवादी भवन म्हणून या जागेचा वापर होत होता. काही दिवसांपासून या फ्लॅटवरील राष्ट्रवादी भवन नावाचा फलक उतरविण्यात आला आहे. दरमहा होणारा खर्च करायचा कोणी, हा देखील प्रश्‍न आहे. २०१९ पासून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद बळिराम साठे सांभाळत आहेत. जिल्हाध्यक्ष साठे यांचा बहुतांश वावर झेडपीतच असतो. राष्ट्रवादीला कार्यालय नसल्याने जिल्हाध्यक्षांना भेटण्यासाठी जिल्हा परिषद किंवा वडाळा हे दोनच मार्ग आहेत.

शहर राष्ट्रवादीचीही व्यथा सारखीच

जशी व्यथा जिल्हा राष्ट्रवादीची तशीच कथा शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयाचीही आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी अध्यक्षाच्या खासगी जागेत कार्यालय सुरू करण्याची प्रथा पक्षस्थापनेपासून ते आजतागायत सुरू आहे. पोटफाडी चौक, शिंदे चौक, सिद्धेश्‍वर मंदिर परिसर यामार्गे शहर राष्ट्रवादीचे कार्यालय आता महापौर बंगल्याजवळील जागेत स्थिरावले आहे. येत्या काळात शहर राष्ट्रवादीचा अध्यक्ष बदलल्यास हे कार्यालय पुन्हा अन्य ठिकाणी हलविले जाणार हे निश्‍चित. अध्यक्ष बदलला की कार्यालय बदलते, ही शोकांतिका शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोसावी लागत आहे.

पवारांचे संपर्क कार्यालय ते राष्ट्रवादी भवन

२००९ मध्ये शरद पवार माढ्यातून खासदार झाले व केंद्रात कृषिमंत्री झाले. सोलापूरसाठी संपर्क कार्यालय असावे म्हणून पवार यांनी रामलाल चौकात संपर्क कार्यालय सुरू केले. २०१४ मध्ये पवार यांच्या खासदारकीची टर्म संपली. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद डोंगरे यांच्याकडून साळुंखे यांच्याकडे आल्यानंतर साळुंखे यांनी ही जागा स्वत:कडे घेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी भवन सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून रामलाल चौकातील या फ्लॅटला कुलूपच दिसत आहे. जिल्हा राष्ट्रवादीच्या इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार असलेली ही वास्तू (राष्ट्रवादी भवन) सध्या कोणाच्या ताब्यात आहे? या वास्तूचे नक्की झाले तरी काय? याबद्दल तर्क-वितर्कांना उधाण येऊ लागले आहे.