
सोलापूर : डॉक्टरांनी तपासलंय, आता गोळ्या द्या वो सायेब
सोलापूर : सकाळपासून बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची वाढलेली गर्दी... शंभरपेक्षा अधिक डॉक्टरांकडून रुग्ण तपासणीचे दिवसभर चाललेले काम... अशक्त, थकवा आलेले वृद्ध, महिला रुग्ण हातात औषधांची चिठ्ठी घेऊन औषध खिडकीच्या जवळ तासन्तास लागलेल्या रांगांत उभारलेले... ‘अहो सायेब, डॉक्टरांनी तपासलंय, आता गोळ्या द्या वो...’ अशी आर्त विनंती करणाऱ्या रुग्णांची अडचण सुटत नाही... हे चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. दिवसभर बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभागातून सुटी झालेले रुग्ण, अचानक अपघाताच्या घटनेमुळे तत्काळ दाखल झालेले रुग्ण या प्रकारच्या अनेक रुग्णांची रुग्णालयात मोठी गर्दी असते. पण एवढ्या रुग्णांना दिवसभरात वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट डॉक्टर्स असे १०० डॉक्टर्स तपासून त्यांना औषधी लिहून देतात. नंतर ती चिठ्ठी घेऊन ओपीडी कक्षात यावे लागते. दिवसभरातील हजारो रुग्णांसाठी केवळ सहा खिडक्या आहेत.
या खिडक्यांवर आधीच संगणकीय प्रणाली बंद आहे. या खिडक्यांवर कधी तीन तर कधी चारच कर्मचारी असतात. त्यापैकी कोणी सुटीवर किंवा रजेवर असला की आणखी पंचाईत होते. रुग्ण तासन्तास औषधांसाठी उभे असतात. अशक्त व थकलेले रुग्ण तेथेच कोठेतरी खाली बसून औषध कधी मिळेल, याची वाट पाहतात. कारण, औषधी विभागात औषध वाटप कर्मचारी उपलब्धच नाहीत. चार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन कर्मचारी भरले गेले नाहीत. त्यामुळे औषध वाटपाला उशीर लागत आहे. यामुळे कर्मचारी देखील त्रासून गेले आहेत.
अशी ही गर्दी रुग्णांची
दररोज बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण १०००
रक्तदाब, हृयविकार व मधुमेहाचे रुग्ण २०० ते ३००
ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण २०० ते ३००
विशेष आजार व स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी केलेले रुग्ण २००
आंतररुग्ण विभागातून किंवा शस्त्रक्रिया होऊन सुटी झालेले रुग्ण १०० ते २००
कर्मचाऱ्यांची सद्य:स्थिती
औषध वाटप खिडक्यांवर असलेले फार्मसिस्ट कर्मचारी : ३
एकूण कर्मचारी पदे : ११
सेवानिवृत्त झालेले कर्मचारी : ४
कामावर असलेले कर्मचारी : ७
सध्या रुग्णालयात पावसाळ्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. पण त्या तुलनेत फार्मसिस्ट कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते आहे. तरीही त्यातून रिक्त पदे भरण्याचा काही मार्ग काढून हा प्रश्न सोडवला जाईल.
- डॉ. रोहन खैराटकर,वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय
Web Title: Solapur Doctor Has Checked Employees For Drug Distribution
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..