Solapur : भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर,माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील, खासदार नाईक-निंबाळकर गटात दुही

श्रेय स्वतःकडे घेण्यात भाजपच्या नेत्यांचा कल असतो. आपल्या नेत्याला श्रेय देण्यातच नेत्यांचे कार्यकर्ते देखील धन्यता मानतात. त्याचाच प्रत्यंतर आता नीरा देवघरचा सुधारित प्रकल्प व फलटण-पंढरपूर या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या आर्थिक सहभागास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर आला आहे.
bjp.
bjp.sakal

Solapur- नीरा देवघरचा सुधारित प्रकल्प व फलटण-पंढरपूर या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या आर्थिक सहभागास मान्यता मिळाल्यानंतर भाजपच्या दोन गटात श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. यासाठी भाजपमधील दोन गटात सोशल मीडिया वॉर रंगले आहे. यानिमित्ताने भाजपमधील प्रखर गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

२०१९ साली रणजितसिंह मोहिते-पाटलांसह फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. या दोघांत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, पक्षाने निंबाळकरांना उमेदवारी दिली. या निवडणुकीतील निंबाळकरांच्या विजयात मोहिते-पाटलांचा मोठा वाटा होता. मात्र, तालुक्यातील भाजपच्या पारंपारिक गटांसह उत्तम जानकर यांच्या गटाचे योगदान देखील महत्त्वाचे होते.

त्यानंतर, विधानसभेला राम सातपुते यांना पक्षाने उमेदवारी दिली. लोकसभा आणि विधानसभेला पक्षाने मोहिते-पाटील यांना विश्‍वासात घेण्यापेक्षा गृहीत धरण्यावरच भर दिला. तरीही मोहिते-पाटलांनी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. दोन्ही निवडणुकांत पक्षाने त्यांना गृहीत धरल्याने खासदार आणि आमदारांनी देखील मोहिते-पाटलांना गृहीत धरण्याची मानसिकता दाखविल्याचे दिसून आले.

पूर्वाश्रमीच्या भाजपच्या नेतेमंडळींशी जुळवून घेण्यासाठी मोहिते-पाटलांनी अनेक पातळीवर प्रयत्न केले. परंतु, जुन्या गटाच्या नेत्यांचे आणि मोहिते-पाटील समर्थकांचे अजूनतरी मनोमिलन झालेले नाही. पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने त्यांच्यातील दुहीचे अनेकवेळा दर्शन घडले आहे.

शासनाच्या वतीने एखाद्या योजनेला मंजुरी मिळाल्यावर त्याचे श्रेय घेण्यासाठी नेते मंडळींची सोशल मीडियावर धडपड सुरू असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठेपण देत, त्यांचे आभार मानले जातात. मात्र, श्रेय स्वतःकडे घेण्यात भाजपच्या नेत्यांचा कल असतो. आपल्या नेत्याला श्रेय देण्यातच नेत्यांचे कार्यकर्ते देखील धन्यता मानतात.

त्याचाच प्रत्यंतर आता नीरा देवघरचा सुधारित प्रकल्प व फलटण-पंढरपूर या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या आर्थिक सहभागास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर आला आहे. २००८ साली नीरा देवघर धरण पूर्ण झाले. या कामात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शरद पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

खंडाळा तालुक्यात या धरणाच्या कालव्याचे ६५ किमीचे काम झाले आहे. उर्वरित खंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्यातील काम अपूर्ण आहे. या सुधारित प्रकल्पास मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटलांनी विधानपरिषदेत केली होती. मागणीचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्र्यानाही दिले होते.

खासदार निंबाळकरांनी देखील ही मागणी केली होती. फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग आणि नीरेच्या पाण्यासाठी खासदार निंबाळकर पहिल्यापासूनच आक्रमक राहिले आहेत. शरद पवार यांच्यावर टोकाची टीका करून पक्षातील स्थान मजबूत करणे आणि जनमानसात चर्चेत राहणे यासाठी त्यांनी हा पाणीप्रश्‍न खुबीने हाताळला आहे.

आता ३१ जानेवारी रोजी नीरा देवघर प्रकल्पास मंत्रिमंडळाने ३ हजार ९७६ कोटी ८३ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. नीरेच्या पाण्याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील १० हजार ९७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शासनाच्या या निर्णयानंतर खासदार निंबाळकर यांचा फलटण आणि माळशिरस तालुक्यात नागरी सत्कार समारंभ पार पडला. भाजपच्या वतीने केलेल्या या सत्कार समारंभापासून भाजपच्या एका गटाने मोहिते-पाटलांना जाणीवपूर्वक दूर ठेवले. ही बाब मोहिते-पाटील समर्थकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यातूनच नीरा देवघरचा इतिहास आणि मोहिते-पाटलांचे योगदान सांगण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत.

भाजपची तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, नीरा देवघर संघर्ष समिती यांच्यासह माळशिरस व नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचा नागरी सत्कार झाला. या कार्यक्रमाला भाजपचे पारंपारिक गटाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, मोहिते-पाटील अथवा त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते. मोहिते-पाटलांना डावलून खासदार गटाने नातेपुते येथे या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यामुळे, तालुक्यात मोहिते-पाटील आणि खासदार गटातील दुहीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

- मनोज गायकवाड

निंबाळकर समर्थक म्हणतात...

१९९५ साली रणजितसिंह निंबाळकर यांचे वडील हिंदूराव निंबाळकर यांनी हा लढा सुरू केला. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी आक्रमकपणे हा प्रश्‍न लावून धरला. एखाद्या कामासाठी निवेदने देणे आणि सोशल मीडियावर माहिती प्रसारित करणे यामुळे प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. त्यासाठी आक्रमकता लागते. गेल्या अनेक वर्षात जे प्रश्‍न मार्गी लागले नाहीत, ते खासदारांमुळे मार्गी लागत आहेत.

मोहिते-पाटील समर्थक म्हणतात...

विजयदादा पाटबंधारे मंत्री असताना धरणाची निर्मिती आणि पाणी वाटप झाले आहे. श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर पाटबंधारे मंत्री असताना सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी फलटणचा पुढे कालवा आणला आहे. विजयदादा व रामराजे निंबाळकर हे नीरा देवघर धरणाचे जनक आहे. त्यांचा नागरी सत्कार होणे गरजेचे आहे. मात्र, नीरा देवघर धरणाचा कालव्याला निधी मंजूर करून आणला म्हणून भाजपचे काही नेते पाठ थोपटून घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com