

सोलापूर - येथील डोणगाव रस्त्यावरील ६५ एकर जागेत आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून आठशे कोटींची गुंतवणूक करून पहिले आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. त्यांचे भूमिपूजन रविवारी (ता. १३) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे व आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज नियोजित आयटी पार्कच्या जागेत पत्रकार परिषद झाली. रविवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता भूमिपूजन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, सतीश मगर, आर्यन ग्रुपचे चेअरमन मुकुंद जगताप, आर्यन ग्रुपचे एमडी स्मिता जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या आयटी पार्कमध्ये आयटीशी संलग्न विविध कंपन्या येणार आहेत. यामध्ये रोबोट निर्मिती, सर्च इंजिन निर्मिती, डेटा सेंटर आदी प्रकारच्या उत्पादनांचा समावेश असेल. मार्च २०२४ अखेर या आयटी पार्कचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. या पार्कमध्ये १० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.
या आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या आयटी कंपन्या, आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्स, उद्योजक आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांना आकर्षित केले जाणार आहे. या माध्यमातून सोलापूरमध्ये आयटी उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.
पहिल्या टप्प्यात टेक्निकल शिक्षण घेतलेले दीड हजार तर नॉन टेक्निकलच्या तीन हजार तरुणांना रोजगार मिळेल. तीन वर्षांत अंदाजे १५ हजार तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे. यानिमित्ताने गेल्या सहा वर्षांचे आयटी पार्कचे स्वप्न साकार होत आहे असे माजी महापौर महेश कोठे यांनी सांगितले.
आर्यन्स ग्रुप भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाबाहेरील सर्च इंजिन हा भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे. याबरोबरच भारतीय बनावटीचे वेब ब्राउजर देखील बनवत आहे. एकूण ८०० कोटीची गुंतवणूक या आयटी पार्कमध्ये पहिल्या टप्प्यात होईल.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, प्रमोद गायकवाड, संजय शेडगे, प्रवीण निकाळजे, महेश चिलवेरी व शेखर शहाणे यांची उपस्थिती होती.
आर्थिक विकासाला चालना
माजी महापौर महेश कोठे यांनी मागील दहा वर्षाचा आयटी पार्क उभारणी प्रयत्नाचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनामुळे हे साध्य करणे शक्य झाले आहे. या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळत असताना रोजगाराच्या संधी वाढतील. अप्रत्यक्षपणे स्थानिक बाजारपेठेला मजबुती येईल.
सिंगापूरच्या धर्तीवर इमारत उभी करणार
आयटी पार्कची इमारत सिंगापूरच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी तयार होणारे रोबोट अऩेक उद्योग व व्यवसायात योगदान देणारे ठरणार आहेत. जगभरात रोबोटची मागणी वाढते आहे अशी माहिती आर्यन ग्रुपचे संचालक संजय शेंडगे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.