रस्ता सुरक्षा समित्या कागदावरच! चार वर्षांत 70 हजार अपघाती मृत्यू | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident news.
रस्ता सुरक्षा समित्या कागदावरच! चार वर्षांत 70 हजार अपघाती मृत्यू

रस्ता सुरक्षा समित्या कागदावरच! चार वर्षांत 70 हजार अपघाती मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर व ग्रामीणमध्ये मागील तीन वर्षांत साडेचार हजार रस्ते अपघातात तब्बल तीन हजार व्यक्‍तींचा अपघाती मृत्यू झाला आहे. जानेवारी ते १४ नोव्हेंबर २०२१ या साडेदहा महिन्यांत सोलापूर शहरातील ५९ जणांचा तर ग्रामीणमधील ४२३ जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान, रस्त्यांवर महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस, आरटीओ या सर्व यंत्रणा असतानाही ना रस्ते अपघात ना मृतांची संख्या घटली, हे वास्तव आहे.

राज्यात २०१८ पासून रस्ते अपघातात तब्बल ७५ हजारांहून अधिक व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रस्ते अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिसांनी वर्षभरात कोणते उपक्रम राबवायचे, यासंदर्भात यापूर्वीच स्पष्टता करण्यात आली आहे. त्यात चौक सभा घेणे, बॅनर्स लावणे, माहितीपत्रके, हस्तपत्रके, वाहनचालक व विद्यार्थ्यांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजन, रिफ्लेटक्‍र लावणे, मोटार वाहन परवान्याबाबत जनजागृती करणे, दूरध्वनी क्रमांकाचे फलक लावणे, अपघातांचे सांकेतिक फलक लावणे, रस्ते सुरक्षा तसेच घोषवाक्‍यांच्या स्पर्धा घेणे, जखमींचा जीव वाचविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, अशा उपक्रमांचा समावेश आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) दुरुस्ती, खड्डे दुरुस्ती, रस्ते तयार करणे, माहितीचे बोर्ड लावणे, दुभाजकांचे रंगरांगोटीचे काम, वाहतूक साधनांची दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रस्ते विकास महामंडळाची आहे. मात्र, मागील काही वर्षांत या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीच नाही हे अपघात अन्‌ मृतांच्या संख्येवरुन स्पष्ट होते. बेशिस्तीच्या नावाखाली दंड वसुली जोरात सुरु असतानाच, तशा वाहनचालकांना कोणीच शिस्त लावत नाही.

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नुसतीच चर्चा

रस्ता सुरक्षा समितीमध्ये खासदार, जिल्हाधिकारी, शहर-ग्रामीणचे पोलिस प्रमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, आरोग्याधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी असतात. या समितीची बैठक किमान महिन्यात एकदा घ्यावी, असे परिवहन आयुक्‍तालयाचे आदेश आहेत. या बैठकीत अपघात व मृत्यू आटोक्‍यात आणण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. मात्र, शहर-ग्रामीणमधील अपघातांची संख्या मागील चार वर्षांत ना अपघात ना मृतांची संख्या कमी झाली. त्यामुळे रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

‘ती’ जीप भरगच्च, तरीही कोणाचे लक्ष नाही

अक्‍कलकोटहून सोलापूरकडे येणारी ती जीप प्रवाशांनी भरगच्च भरलेली होती. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक त्यातून केली जात होती आणि विशेषत: आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने खासगी प्रवासी वाहनांकडून नियमांचे पालन होत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, वाहनचालकांना मोबाईलवर बोलण्यास निर्बंध असतानाही तो जीपचालक मोबाईलवर बोलत होता. अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा होता, असेही काहीजण सांगत आहेत. एकूणच या अपघाताची कारणमीमांसा केल्यास मृतांचा काय दोष, असा प्रश्‍न पुढे येतो. शासकीय यंत्रणांना जबाबदारी वाटून दिलेली असताना, त्यांच्याकडून प्रभावीपणे काम होत नसल्याचेच या अपघातातून समोर आले आहे.

अपघाताची प्रमुख कारणे अन्‌ उपाययोजना

  • सर्व्हिस रोडवर अतिक्रमण, साईडपट्टीवर मुरुम दिसत नाही; त्याची दुरुस्ती गरजेची

  • राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठे खड्डे, रस्त्याला भेगा; दुरुस्तीचे गांभीर्य नाहीच

  • महामार्गांवर प्रबोधनपर फलकांची संख्या खूपच कमी; रस्त्यांचे दुभाजक तोडून वाहनांची ये-जा

  • महामार्ग तथा वाहतूक पोलिसांचे दंड वसुलीवरच लक्ष; बेशिस्तांना शिस्त लावण्याची गरज

तीन वर्षांतील शहर-ग्रामीणमधील स्थिती...

(जानेवारी ते ऑक्‍टोबर २०१९)

  • एकूण अपघात : १०७७

  • अपघाती मृत्यू : ५०१

(जानेवारी ते ऑक्‍टोबर २०२०)

  • एकूण अपघात : ७३३

  • अपघाती मृत्यू : ३६५

(३१ ऑक्‍टोबर २०२१ पर्यंत)

  • एकूण अपघात : ८७५

  • अपघाती मृत्यू : ४५५

loading image
go to top