
Solapur News : S T बस मधून उतरताना एक लाख 89 हजार रुपयाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
सोलापूर : एसटी बस मधून खाली उतरताना दोघा अनोळखी महिलांनी धक्काबुक्की करून एका महिलेचे 1 लाख 89 हजाराचे सोन्याचे दागिने पर्स मधून चोरून नेल्याची घटना सोमवार ता 13 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता टाकळी सिकंदर चौकात घडली. या बाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, बाई हरिदास ननवरे रा. कुरूल या सोमवारी सकाळी दहा वाजता कुरुल येथून पंढरपूर येथे बहिणीच्या नातवाच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या भावकीतील दिलीप ननवरे यांच्या मोटारसायकलवर बसून गेल्या होत्या. विवाह सोहळा उरकल्यावर घरी परत येताना बाई ननवरे यांना त्यांची जावु पूजा ननवरे या भेटल्या.
दोघीही एकाच गावच्या रहिवाशी असल्याने पंढरपूर येथील बस स्थानकावर येऊन पंढरपूर- पुळुज या बस मध्ये त्या दोघी बसल्या. त्यावेळी बाई ननवरे यांच्या जावेने गळ्यातील गंठण, नेकलेस, मनी मंगळसूत्र असे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवले होते. त्या दोघी एसटीतून सव्वा पाच वाजता टाकळी चौकात उतरल्या. उतरताना बाई ननवरे यांच्या पुढे व मागे अशा दोन अनोळखी महिला होत्या. त्या धक्काबुक्की करून निघून गेल्या.
दरम्यान त्या दोघींचा संशय आल्याने बाई ननवरे यांनी पर्स कडे पाहिले असता पर्सची चेन अर्धवट उघडी दिसली. त्यानंतर त्यांनी पर्स तपासली असता, जावु पूजा ननवरे यांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले.
त्यावेळी त्या अनोळखी महिलांनीच सोन्याचे मनी मंगळसूत्र, गंठण व नेकलेस असा एकूण एक लाख 89 हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले. या घटनेची फिर्याद बाई हरिदास ननवरे रा कुरूल यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण करीत आहेत.