Solapur : निवडणूक ग्रामपंचायतींच्या, चर्चा आमदारकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील

Solapur : निवडणूक ग्रामपंचायतींच्या, चर्चा आमदारकी

सांगोला : सांगोला तालुक्यातील फक्त सहा ग्रामपंचायतींची निवडणूक झाली असली तरी या निवडणूक निकालानंतर थेट आमदारकीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. दावे - प्रतिदावे दोन्हीकडील कार्यकर्ते सोशल मीडियावर कमेंट करीत असले तरी या निवडणुकीत पक्षापेक्षा आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील गटाचे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाविरोधात एकत्रित आल्याचे दिसून आले.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष, गटापेक्षा स्थानिक आघाड्यांना प्राधान्य दिले जात असते. सांगोला तालुक्यामधील झालेल्या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यावेळी मात्र पक्षापेक्षा आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील व शेतकरी कामगार पक्षाचा गटातटामध्येच झाल्याची दिसून आले.

पाचेगाव खुर्द व इतर काही गावातील सदस्य बिनविरोध निवडीसाठी स्थानिक आघाडी व पक्ष एकत्रित आले मात्र सर्व गावांच्या निकालानंतर बलवडी, चिणके, पाचेगाव खुर्द सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडीनंतर एकमेकांच्या विरोधात दावे-प्रतिदावे करु लागले आहेत. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात पक्षापेक्षा आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील गटाने एकत्रित येत चांगले

यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील एकीकडे पक्ष गटातटाचा संघर्ष सुरू असला तरी मात्र सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे - पाटील, शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील सर्व कार्यक्रमात नेहमी एकत्रीत असतात. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे ग्रामीण भागातील कार्यकर्तेही एकवटले असल्याचे दिसून आले. शेकाप पक्षाने आपले प्राबल्य असलेल्या अनकढाळ व चिंचोली दोन गावातील गड एकहाती कायम राखले.

यावेळी तालुक्यातील फक्त सहा ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या असल्या तरी यापुढे येणाऱ्या आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानल जाते. त्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्रितच शेकाप विरोधात लढतील असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. या अगोदर सांगोला म्हटलं की शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. ग्रामीण भागात शेकाप पक्षाचे वर्चस्वही आहे. यापुढे येणाऱ्या निवडणुकीत हे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची कस लागणार आहे.

ठळक बाबी -

- या निवडणुकीमध्ये शेकाप विरोधात आजी-माजी आमदारांचे गट एकत्रित

- पक्षापेक्षा वैयक्तिक गटावरच लढवली गेली निवडणूक

- गावातील स्थानिक गटाने लढवलेल्या व बिनविरोध झालेल्या सदस्यांवर सर्वांचेच दावे - प्रतिदावे

- या निवडणुकीतील राजकीय समीकरणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरणार लक्षवेधक

- सहा ग्रामपंचायतींमध्ये चार आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील गटाकडे तर दोन शेकापकडे

- आगामी निवडणुकीत शेकाप पक्षाच्या नेतृत्वाची लागणार कस