Solapur : विमानसेवेच्या प्रश्‍नावर पालकमंत्री विखे-पाटलांची कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

radhakrishna vikhe patil

Solapur : विमानसेवेच्या प्रश्‍नावर पालकमंत्री विखे-पाटलांची कोंडी

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक संपत असतानाच माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्‍न मांडला. बैठकीवर पकड मिळविलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विमानसेवेच्या प्रश्‍नावर गडबडताना दिसले. बोरामणी की होटगीरोड विमानतळ यामध्ये पालकमंत्र्यांची कोंडी झालेली दिसली. विमानसेवा का सुरू होत नाही, सोलापूरकरांना माहिती असलेलीच कारणे सांगून पालकमंत्र्यांनी वेळ मारुन नेल्याचे दिसले.

सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी करताच चाणाक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळाचाही मुद्दा उपस्थित केला. काही क्षणात घडलेल्या या चर्चेत खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी उडी घेत ताई आगोदर कुठला तरी एक निर्णय करा, असे सांगितले. आगोदर होटगीरोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करा नंतर बोरामणीचे विमानतळ करा प्रस्तावही काही सदस्यांनी मांडला.

आमदार शिंदे यांनी पुन्हा लक्ष वेधत बोरामणी विमानतळासाठी जमीन संपादित झाली आहे. केवळ ३३ हेक्‍टरचे निर्वनीकरण बाकी असल्याने हे काम थांबल्याची आवठण करून दिली. होटगी रोडवरुन विमानसेवा आणि बोरामणीचे विमानतळ अशा पातळीवर एकाचवेळी काम करावे, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली. त्यांच्या मागणीला खासदार महास्वामी यांनी देखील या प्रस्तावाला होकार दर्शविला.