
सोलापूर : महागाईची झळ सोसवेना
सोलापूर : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती रोजच्यारोज वाढत आहेत. इंधनदर वाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आणि किराणा, भुसार माल, भाजीपाला, दूध या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत गेले. महागाइचा मुद्दा सध्या सर्वात महत्त्वाचा असताना इतर मुद्यांवर राजकीय पक्षांची आंदोलन होत आहेत, हे सर्वसामान्य नागरिकंसाठी अत्यंत क्लेशदायक आहे.
नियमित वाढत जाणाऱ्या महागाइचा फटका रोजंदारी कामगार, सरकारी नोकरदार, व्यापाऱ्यांनाही बसत आहे. शाळेची फी, शालेय साहित्याचा वाढता खर्च, गॅस, विजेचे वाढते बील, रोज लागणारे पेट्रोल यातील कोणतीही वस्तू कमी करता येत नाही. महागाईच्या संकटाला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
कोरोनानंतरचे सर्वात मोठे संकट
मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर होता. ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. कोरोनाची लाट कशीबशी आवाक्यात आली. लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेची झळ बसली नाही. मात्र, कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावून नेले. कुणाच्या जवळच्या माणसांचा बळी गेला तर कोणाला शहर सोडून दुसरीकडे वास्तव्यास जावे लागले. या महाप्रलयकारी संकटापाठोपाठ महागाईचा आगडोंब उसळला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे अनेक दिवस थांबलेली इंधन दरवाढ अगदी कमी दिवसात दोन टप्प्यातच ३० रुपयांनी वाढली. गॅस महागला. डिझेल दरवाढीचा परिणाम सर्व वस्तूंच्या दरवाढीवर झाला.
असहाय्य दाहकता
उच्च मध्यमवर्गीय, व्यापारी यांना बसणऱ्या महागाइची दाहकता असहय्य झाली आहे. हॉटेलमधील खाद्य पदार्थांच्या दारात कमालीची दरवाढ झाली आहे. यामुळे कारोनापूर्वी दर आठ- दहा दिवसांनी होणारे हॉटेलिंग आता महिन्यांतून एकदा करणेही कठीण झाले आहे. शालेय साहित्य, गणवेश, शाळेची फी यातही वाढ झाली आहे. दुधाचे दर वाढले आहेत. यामुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा खर्च वाढला आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे लहानसहान कामसाठी दुचाकी बाहेर काढणेही परवडेनासे झाले आहे. वाढत्या इंधनदारामुळे आणि हॉटेलमधील पदार्थांच्या दराचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. सर्व ठिकाणचे दर वाढल्याने निर्बंध उठल्यानंतरच्या पहिल्या उन्हाळ्याच्या सुटीतील अपेक्षीत गर्दी पर्यटनस्थळांवर यंदा दिसनेसी झाली आहे. एकंरीत या सर्व ठिकाणच्या महागाईची दाहकता असहय्य झाली आहे.
Web Title: Solapur Inflation Does Not Sosvena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..