Solapur : पुनर्वसन पॅकेजची योग्य माहिती द्या : नीलम गोऱ्हे Solapur information about rehabilitation package Neelam Gorhe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neelam Gorhe News

Solapur : पुनर्वसन पॅकेजची योग्य माहिती द्या ; नीलम गोऱ्हे

पंढरपूर : प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरची आखणी करताना नियोजन सल्लागार, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय असला पाहिजे. पंढरपूरमधील स्थानिक वारकरी आणि लोकांनी तयार केलेल्या आराखड्यातील चांगल्या सूचनांचा आवर्जून विचार करावा. वाराणसी येथे कामे करताना पुनर्वसनाचे पॅकेज कसे दिले होते याची माहिती प्रशासनाने लोकांना देऊन लोकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करावेत असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंढरपूर कॉरिडॉर हा वाराणसी पेक्षाही अधिक चांगला करायचा निर्णय आपण घेऊ. वाराणसी प्रमाणेच पंढरपूरला केंद्र सरकारने निधी दिला असला तरी स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊनच पंढरपूरच्या विकासाचे वेगळे मॉडेल तयार करण्यात येईल असे या बैठकीत स्पष्ट केले.

आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी नियोजित पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत पंढरपूर कॉरिडॉर आणि पालखी मार्गावरील अडचणींच्या संदर्भात श्रीमती गोऱ्हे यांनी बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विधान भवनात बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या संदर्भात मिळणाऱ्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकी पूर्वीच आश्वासित केले असल्याचे श्रीमती गोऱ्हे यांनी बैठकीत नमूद केले.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पंढरपूरला लाखो भाविक येत असतात. त्यांना चांगल्या सोईसुविधा मिळाव्यात यादृष्टीने कॉरिडॉरचा आराखडा शासन तयार करत आहे. हे काम निश्चितपणे समन्वयाने होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे नमूद केले.

महसूलमंत्री श्री. विखे-पाटील यांनी पंढरपूरसाठी चांगला आराखडा बनवण्यात येणार असून शासन स्तरावर त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. स्थानिक नागरिक आणि वारकरी यांना विश्वासात घेऊनच ही कामे केली जाणार असल्याचे सांगितले.

आमदार समाधान आवताडे यांनी आराखडा तयार करताना सर्वांचाच विचार व्हायला हवा. स्थानिक नागरिकांना जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी. यात्रांच्या काळातील समस्यांचा विचार करुन त्यावर ठोस उपाय करायला हवेत. प्रामुख्याने श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेचा कालावधी कमीत कमी कसा करता येईल यादृष्टीने विचार झाला पाहिजे अशा सूचना केल्या.

आमदार महादेव जानकर यांनी पंढरपूरचा विकास करत असताना सर्वांनी शासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले तर आमदार मनिषा कायंदे यांनी पंढरपूर येथील व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यादृष्टीने देखील विचार झाला पाहिजे असे नमूद केले.

आमदार अमोल मिटकरी यांनी वारकऱ्यांच्या भावना जपून विकास व्हावा. सोईसुविधांसाठी नगरपालिकेच्या जागांचा विचार प्राधान्याने करावा अशी मागणी केली. आमदार सचिन अहिर यांनी विकास व्हावा परंतु पंढरपूरकरांना विश्वासात घेऊनच व्हावा अशी मागणी केली.

या बैठकीस आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, पुरातत्त्व खात्याचे संचालक तेजस गर्गे, उपसंचालक श्री. वाहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील गावडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,

नगरविकास विभागाचे सहसचिव प्रतिभा भदाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सदस्य माधवी निगडे, संभाजी शिंदे, पत्रकार सुनील उंबरे, सुनील दिवाण, वीरेंद्रसिंह उत्पात, आदित्य फत्तेपूरकर, बाबाराव बडवे, रामकृष्ण वीर महाराज, गणेश लंके, गजानन भिंगे आदी उपस्थित होते.