
Solapur : आमदार मोहिते-पाटील अन् संजय शिंदे यांच्यामधील शह-काटशहाच्या राजकारणाचा पुन्हा हंगामा
शिवाजी भोसले
सोलापूर : जिल्ह्यावरील वर्चस्वासाठीचे अकलूजकर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील अन् माढेकर आमदार संजय शिंदे यांच्यामधील शह-कटशहाचे राजकारण तसे सोलापूर जिल्ह्याला परिचित. प्रत्येक ठिकाणी अन् प्रत्येक वेळी दोघांनीदेखील एकमेकांना कात्रजचा घाट दाखविलेला.
एकमेकांचे कट्टर राजकीय दुष्मन असलेल्या शिवाय एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या अकलूजकर आणि माढेकरांनी आयती संधी आल्यावरच एकमेकांना खपविले असे नाही, तर एक-एक संधी शोधून काढत, एकमेकांवर कुरघोड्याचे राजकारण केले. जिल्ह्याने या दोघांमधील राजकीय संघर्षाचा अंक पाहिला.
मध्यंतरीच्या काळामध्ये उभयतांमधला राजकीय संघर्ष तसा थोडा शांत झाला होता. पण, वर्चस्वाच्या लढाईत जे काही खपवा-खपवीचे राजकारण खेळले गेले होते, त्याच्या न सुकलेल्या जखमा आजही मनात सलत असाव्यात. म्हणूनच की काय मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही पाणी पुलाखालून वाहिले, त्याबद्दलचे सिंहावलोकन अन् निर्माण झालेली अनकूल परिस्थिती याअधारे अकलूजकर सिंह माढेकरांवर चढाई करण्यासाठी सज्ज झालेत तशी त्यांनी ललकारीदेखील दिली आहे.
माढेकरांवर चढाई करण्यासाठी निघालेल्या सिंहानी करमाळ्याच्या बागलांसह जिल्ह्यातील शिंदे विरोधामधील असंतुष्टांचं बिऱ्हाड आपल्यासोबत घेतले आहे.
विशेषत्वे, ज्या बारामतीकर काका-पुतण्याची ‘पॉवर’बाज ताकद घेऊन माढेकर संजय शिंदे यांनी मोहिते-पाटील यांना गारद करण्याचा प्रयत्न केला, जिल्ह्यावरील मोहिते-पाटील राज संपुष्टात आणले.
त्याच बारामतीकरांच्या लाडक्या पण सध्या राष्ट्रवादीच्यादृष्टिने उध्दवस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या गडात मोहिते-पाटील ‘भाजप’ची ताकद पाठिशी घेऊन आमदार संजय शिंदे यांचे संस्थान खालसा करण्यासाठी सज्ज झालेत. मिनीमंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेवरील ‘शिवरत्न’ राज ज्या संजय शिंदे यांनी घालविले, त्याच शिंदेंचे आमदारकीचे सिंहासन डळमळीत करण्याचा जणू विडा अकलूजकरांनी उचलला आहे.
माढेकरांचे आमदारकीचे साम्राज्य खालसा केले की जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्याला त्यांना अवसान राहात नाही, हे गृहीत धरुन मोहिते-पाटील यांनी शिंदेंच्या आमदारकीचे सिंहासन उलथून टाकण्यासाठी करमाळा विधानसभेतच्या प्रांतात जोरकसपणे डरकाळ्या फोडायला सुरवात केली.
करमाळा विधानसभा मतदार संघामधील संजय शिंदे यांचा आमदारकीचा बाजार उठविण्यासाठी स्थानिक बागल गटाला गटाला ताकद देण्याची मानसिकता मोहिते-पाटील यांनी केली आहे. खास बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार तसेच अजित पवार यांची ताकद घेऊन करमाळ्याच्या बागल यांनी कधी काळी मोहिते-पाटील यांना आस्मान दाखविले.
त्याचा इतिहास रचला गेला. जिल्ह्यातील बडे व मातब्बर म्हणून नावलौकीक असलेल्या मोहिते-पाटील यांना औकात नसाताही बागलांनी ताकद दाखविली. अकलूजच्या सिंहांच्या डरकाळ्या तत्कालीनवेळी शिण झाल्या. मोठा अवमान आणि अपमान अकलूजच्या सिंहांचा त्यावेळी झाला. बागल यांनी तत्कालीनवेळी जे काही केले, त्यातून मोहिते-पाटील यांना खूप काही भोगावे अन् सोसावे लागले.
बागल यांच्याबाबतीमधील इतके सगळे विसरून तसेच झालेला मान, अपमान त्याचबरोबर अवमान हे सगळे काही गिळून मोहिते-पाटील हे बागल यांना सोबत घेऊन माढ्याच्या शिंदे यांना टक्कर द्यायला निघालेत. बागल यांच्याबाबतीत अत्यंत मोठी आणि त्यागाची भूमिका घेऊन मोहिते-पाटील यांनी डरकाळ्या फोडणे सुरु केले आहे, याचा अर्थ अकलूजकरांचे आगामी काळातील राजकीय व्हिजन किती मोठे असावा, याचा अंदाज येतो.
बागलांना मिळू शकते ‘शिवरत्न’ अन् ‘कमळा’ ची ऊर्जा
रश्मी बागल- कोलते आणि दिग्विजय बागल यांची राजकीय वाटचाल अस्थिर आणि दिशाहीन आहे. या दोघांचेही राजकीय भवितव्य प्रकाशमय नाही. राजकीय स्थिरतेसाठी तसेच करिअरसाठी राजकीय ‘गॉडफादर’ व सक्षम पक्षाच्या वळचणीची गरज आहे.
सध्या जणू काही ते पोरके आहेत. या अत्यंत महत्वाच्या राजकीय वळणावर मोहिते-पाटील हे त्यांच्या कामी येऊ शकतात. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या रुपाने बागल यांना गॉडफादर मिळू शकतो, शिवाय भाजपसारख्या राजकीय भवितव्य ब्राईटनेस असलेल्या पक्षाचा झेंडा बागलांच्या हाती येऊ शकतो. मोहिते-पाटील यांच्या ‘शिवरत्न’ अन् भाजपच्या ‘कमळा’ ऊर्जा बागलांना मिळू शकते.