Solapur : कार्तिकी वारी : दर्शनरांगेतील दाम्पत्याला यंदा महापूजेची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर्शनरांगेतील दाम्पत्याला यंदा महापूजेची संधी

कार्तिकी वारी : दर्शनरांगेतील दाम्पत्याला यंदा महापूजेची संधी

पंढरपूर (सोलापूर) : गेल्या वीस महिन्यांमध्ये कोरोनाच्या सावटामुळे पंढरपुरात वारी भरु शकली नव्हती. त्यामुळे आषाढी आणि कार्तिकी महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील विणेकऱ्यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून मान देण्यात आला. यंदा पुन्हा वारी भरल्याने दर्शन रांगेतील दांम्पत्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून एका दांम्पत्यास पूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वीस महिन्यात पंढपुराता यात्रा भरु शकल्या नव्हत्या. या दरम्यानच्या काळात श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील विणेकरी लोकांच्या चिठ्ठी टाकून वारकरी प्रतिनिधी म्हणून सपत्निक उपस्थित राहण्याचा मान दिला गेला. त्यामुळे वर्षानुवर्षे मंदिरात विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या मंडळींना वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेची संधी मिळाली. आता यंदा पुन्हा वारी भरल्याने श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या दर्शन रांगेतील एका दांम्पत्याची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जाणार आहे.

हेही वाचा: श्री विठ्ठल-रुक्‍मिणीला महापूजेसाठी बनारसी पोशाख

सव्वादोन वाजता महापूजा

दरम्यान, कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक होणार आहे. सोमवारी एकादशीदिवशी पहाटे सव्वादोन वाजता श्री. पवार हे सपत्निक, सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात येतील. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी श्री विठ्ठलाच्या महापूजेस प्रारंभ होईल. तीन वाजेपर्यंत ही पूजा संपन्न होईल. त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेच्या पूजेस प्रारंभ होईल. ही पूजा साडेतीन वाजता झाल्यावर पावणेचार ते साडेचार यावेळात श्री. पवार यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

loading image
go to top