Solapur : प्रभाग रचनेनंतरच आघाडीची रणनीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

Solapur : प्रभाग रचनेनंतरच आघाडीची रणनीती

सोलापूर : तीन की चार सदस्यांचा एक प्रभाग याचा निर्णय १४ नोव्हेंबर (सोमवारी) होईल. त्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचे हे निश्चित होणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकांना आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यादेखील रखडल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबरअखेरीस निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक शाखेतील विश्वसनिय सूत्रांनी दिली.

राज्यातील मुंबईसह २३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या, २०७ नगरपालिका, १३ नगरपंचायती मुदत यापूर्वीच संपली आहे. तत्पूर्वी, महाविकास आघाडी सरकारने महापालिका प्रभाग पध्दती बदलून त्यांना सोयीची होईल अशी तीन सदस्यीय प्रभाग तथा वॉर्ड करण्याचा निर्णय घेतला होता. पण, राज्यात सत्तांतर झाल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने वार्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग आणि इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग केला होता. शिंदे सरकारने २०१७ प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला होता. त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, राज्य सरकारने दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. ही मुदत १४ नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने त्या दिवशी निकालाची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालावर आघाडीची समिकरणे बदलणार आहेत.

नोव्हेंबरअखेरीस महापालिकांची निवडणूक

मार्चपासून महापालिकांवर प्रशासक आहेत. कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आठ महिन्यांपासून प्रशासकराज आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय आता झाला असून पावसाळा पण संपला आहे. पूर्वीच्या चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्यास काही बदल करण्याची गरज नाही. तसेच बदललेल्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याची वेळ आली तर त्याची सर्व प्रक्रिया यापूर्वीच पार पडली आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेरीस महापालिका, नगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीची शक्यता कमीच

बऱ्याच जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसची ताकद काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक आहे. सोलापूर महापालिकेत यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेना व भाजप युतीला टक्कर दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला सोबत घेतल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार आहे. ज्या प्रभागांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद मोठी, त्याचठिकाणी शिवसेनेच्या इच्छुकांना उमेदवारी हवी आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची शक्यता धुसर मानली जात आहे. तरीपण, शिंदे-फडणवीस सरकारला रोखण्यासाठी प्रभाग रचनेच्या निकालावर अंतिम निर्णय होईल.