
Solapur : ‘लम्पी’चा जनावर बाजाराला फटका
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाजाराला यंदा लम्पी रोगाचा फटका बसणार आहे. बाजार भरविण्यासाठी मंदिर समिती परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. जनावरांचा बाजार भरणार की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत.
दरवर्षी रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जनावर बाजाराने श्री सिद्धेश्वर यात्रेला सुरवात होते. १५ डिसेंबरनंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी जनावर बाजार भरविला जातो. यात्रा काळात सलग दहा दिवस हा बाजार भरलेला असतो. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून शेतकरी जनावरे विक्रीसाठी घेऊन येतात. या बाजारामध्ये साधारण चार ते पाच हजार वेगवेगळ्या जातीच्या गायी व म्हशी असतात. सर्वच जातीची, कमीत कमी ते अधिकाधिक दर असलेली जनावरे या बाजारात विक्रीसाठी येतात. जनावर खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते.
जनावर विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना कमी मोबदल्यात झुणका-भाकर अशी जेवणाची खास सोय असते. परंतु, यंदा लम्पी आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून गावपातळीवरील जनावर बाजार भरविण्यास शासनाने बंदी केली आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी भरविण्यात येणाऱ्या जनावर बाजारालाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. लम्पी हा आजार गायींना होत असल्याने म्हशींच्या बाजाराला परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर समिती परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, प्रत्यक्षात आज (मंगळवार) पासून बाजार भरणे अपेक्षित होते; तो न भरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कृषी प्रदर्शनाची थाटणार दालने
तब्बल दोन वर्षांनंतर भव्य स्वरूपात थाटण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे आज (मंगळवारी) भूमिपूजन करण्यात आले. होम मैदानावर पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, काशिनाथ दर्गो-पाटील, विश्वनाथ लब्बा यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्या (बुधवार) पासून कृषी प्रदर्शनासाठी दालने थाटण्यात येणार आहेत.
मंदिर स्वच्छतेला वेग
यात्रेला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असल्याने श्री सिद्धेश्वर मंदिराची रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, विद्युत रोषणाई आदी कामांना वेग आला आहे. तर यात्रा काळात भक्तांसाठी दिवसभर सुरू राहणाऱ्या ‘दासोह’साठीच्या तयारीलाही गती आली आहे.