
पानगाव : तरुणांमध्ये भारतीय सैन्य दलाचे विशेष आकर्षण असलेले गाव म्हणून सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील पानगावचा उल्लेख केला जातो. गावात भारतीय सैन्य दलात सध्या कर्तव्यावर असणाऱ्या व सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानांची संख्या लक्षणीय आहे. आतापर्यंत पानगावचे चार जवान देशासाठी हुतात्मा झाले आहेत. दिगंबर चव्हाण, अभिमन्यू पवार, राजेंद्र मोरे आणि सुनील काळे या जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांनी दिलेले बलिदान हे ग्रामस्थांसाठी विशेषतः तरुणांसाठी नेहमीच प्रेरणा देणारे आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे बंडजू प्रांतात २३ जून २०२० रोजी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत पानगावचे सुपुत्र सीआरपीएफचे जवान सुनील काळे हे हुतात्मा झाले होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली होती. परंतु, अशा कठीण प्रसंगात खचून न जाता येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शहीद सुनील काळे यांच्या कुटुंबीयांसह ग्रामपंचायत, तंटामुक्त गाव समिती, माजी सैनिक संघटना, उपशाखा पानगाव, शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्था, पालवी फाउंडेशन आदींच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती विविध उपक्रमांतून जपल्या जात आहेत. शहीद वीरांच्या स्मृती त्यांचे कुटुंबीय तर जपत आहेतच, परंतु पानगावमधील माजी सैनिकांनी शहीद सुनील काळे व त्यांच्यापूर्वी शहीद झालेले दिगंबर चव्हाण, अभिमन्यू पवार व राजेंद्र मोरे यांच्या स्मृती जपण्यासाठी शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून पानगावमध्ये भव्य शहीद जवान स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
शहीद सुनील काळे यांच्या स्मृती जपण्यासाठी गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा तसेच मुलांची शाळा आणि संत तुकाराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बक्षीस वितरण केले जाते. एवढेच नव्हे तर शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिनी आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक असे पुरस्कार देखील दिले जात आहेत.
लोकसहभागातून ग्रामविकास या संकल्पनेतून काम करणाऱ्या पालवी फाउंडेशनने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुनील काळे यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या स्मशानभूमीत त्यांच्या नावे वृक्षारोपण केले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विविध समाजोपयोगी कार्यक्रमांत दरवेळी आमंत्रित करण्यात येते. गावात सैन्यदलातून निवृत्त झालेले दामोदर पवार हे १५ जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी ‘आर्मी डे’ साजरा करतात. या कार्यक्रमाची सुरवात ही प्रथम शहिदांना अभिवादन करूनच केली जाते. तसेच त्या दिवशी गावातील सर्व आजी-माजी सैनिक आणि शहिदांचे कुटुंबीय एकत्र येत कौटुंबिक चर्चा करतात. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ असे म्हणतात. त्यासाठी भावी पिढीने त्यांच्या स्मृती विविध माध्यमातून जपल्या पाहिजेत, असे जाणकार आवर्जून सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.