तब्बल दोन वर्षांनंतर मार्कंडेय जलतरण तलाव सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swimming pool

तब्बल दोन वर्षांनंतर मार्कंडेय जलतरण तलाव सुरू

सोलापूर - कोरोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेल्या महापालिकेच्या तिन्ही जलतरण तलावांपैकी मार्कंडेय जलतरण तलाव शनिवारपासून सुरू करण्यात आला. अवघ्या एका दिवसात २५ जणांनी प्रवेश घेतला आहे. या ठिकाणी फिल्टर प्लॅंटची सुविधा दिली असून सुंदरम नगर येथील जलतरण तलाव लवकरच सुरू करणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. पार्क चौकातील सावरकर जलतरण तलाव, पोलिस मुख्यालय जवळील मार्कंडेय जलतरण तलाव आणि विजापूर रोडवरील सुंदरम नगर तलाव असे महापालिकेच्या मालकीचे तीन जलतरण तलाव आहेत. पार्क चौक येथील तलाव छोटा असून उर्वरित दोन्ही तलाव हे ऑलिम्पिक दर्जाचे आहेत. या तलावांमध्ये खास उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तर काही ॲकॅडमींकडून स्पर्धेसाठी बॅचेस घेतले जातात. तीन महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंत पासेसची सुविधा उपलब्ध आहे. शहरातील साधारण सहा हजार नागरिक या जलतरण सुविधेचा लाभ घेतात. मात्र नुकतेच महापालिकेने मार्कंडेय तलाव आणि सुंदरमनगर जलतरण तलाव १८ महिन्यांकरिता खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर चालवायला देण्याकरिता निविदा काढली आहे. त्यासाठी महापालिकेने ३० लाख रुपये भाडे निश्चित केले आहे. कोरोनापूर्वी पासेसच्या संख्येवरून हे भाडे निश्चित करण्यात आले आहे. या तलावांची किरकोळ दुरुस्तीदेखील संबंधित संस्थेकडे देण्यात येणार आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मक्ता निश्चित करेपर्यंत तूर्तास महापालिकेने मार्कंडेय जलतरण तलाव सुरू केला आहे. येत्या आठवडाभरात विजापूर रोड येथील तलाव सुरू होईल तर पार्क चौकातील तलाव स्मार्ट सिटीच्या ताब्यात असून, सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

असे आहेत पासेसचे दर

विद्यार्थी मासिक - ४०० रुपये

विद्यार्थी वार्षिक - २००० रुपये

व्यावसायिक मासिक - ९०० रुपये

व्यावसायिक वार्षिक - ५००० रुपये

पंचवार्षिक - २० हजार रुपये

दहा वर्षांसाठी - ३८ हजार रुपये

ज्येष्ठ नागरिकांसाठी - एकूण फीवर ५० टक्के सूट

६० वर्षांपासून सुविधा उपलब्ध

पार्क स्टेडियम येथील सावरकर तलाव हा शहरातील पहिला जलतरण तलाव आहे. १९७० मध्ये याची उभारणी झाली आहे. त्यापाठोपाठ १९८५ मध्ये मार्कंडेय जलतरण तलाव बांधण्यात आला. अवघ्या सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये विजापूर रोड सुंदरमनगर येथील तलाव महापालिकेच्या ताब्यात आला. २००९ मध्ये या तलावाची निर्मिती करण्यात आली. सुरवातीची सहा वर्षे या तलावाचा ताबा जिल्हा क्रीडा विभागाकडे होता.

Web Title: Solapur Muncipal Markandey Swimming Pool Started

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top