
सोलापूर : महापालिका ठरवणार ‘शहर मध्य’चा आमदार
सोलापूर : एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख, काँग्रेसचे माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. दुसरीकडे एमआयएमनेही जम बसवायला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीतील विजयावर शहरातील ‘शहर मध्य’चा पुढील आमदार कोण, याचा अंदाज येणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी हॅट्ट्रिक केली आहे. पण, आता पुढच्या निवडणुकीत त्यांना ताण काढावा लागेल, हे निश्चित आहे.
जिल्ह्यात शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. शहर उत्तर मतदारसंघात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्राबल्य असून, त्या मतदारसंघात सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून आले. शहर मध्य व दक्षिण सोलापूर मतदारसंघातही भाजपचे नगरसेवक विजयी झाले होते. शहर मध्यच्या आमदार काँग्रसेच्या असतानाही त्याठिकाणी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस मागच्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिला. आता राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसला मागे टाकून महापौरपद मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. या तिन्ही पक्षांशी भाजपचा मुकाबला असणार आहे.
आपापसातील भांडणाचा मोठा लाभ भाजपला होणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावे, अशी नेत्यांची अपेक्षा आहे. पण, त्यांनी सन्मान मिळावा, पक्षाची ताकद असलेले प्रभाग मिळावेत, अशी मागणी केली आहे. त्यावर कशा पद्धतीने तोडगा निघतो, यावर भाजप राजकीय डावपेच आखणार आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक कोणाचे, विशेषत: शहर मध्यमधून कोणाचे अधिक नगरसेवक विजयी होतात, यावर तेथील पुढचा आमदार ठरेल, अशी चर्चा आहे.
उमेदवारांच्या स्पर्धेत प्रणितींचेही घटले मताधिक्य
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. पण, २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत एमआयएमला त्या ठिकाणी यश मिळाले नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना ६८ हजारांहून अधिक मते मिळाली, पण २०१४ च्या निवडणुकीत तौफिक शेख यांच्यामुळे त्यांचे मताधिक्य घटले आणि आमदार प्रणिती शिंदे यांना ४६ हजार ९०७ मते मिळाली. मागील निवडणुकीत फारुक शाब्दी यांनी एमआयएमकडून निवडणूक लढविली आणि त्यांनी तौफिक शेख यांच्यापेक्षा अधिक (३८,७२१) मते घेतली. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना ५१ हजार ४४० मते मिळाली. आता याच मतदारसंघातील ॲड. बेरिया, तौफिक शेख हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने आगामी निवडणुकीत चौथ्यांदा विजयी होण्यासाठी प्रणिती शिंदे यांना महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
Web Title: Solapur Municipal Corporation Decided Mla City Central
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..