`या`महापालिकेत शिवसेनेच्या स्वतंत्र गटाचा विषय बारगळला 

`या`महापालिकेत शिवसेनेच्या स्वतंत्र गटाचा विषय बारगळला 

सोलापूर : राज्यातील महविकास आघाडीचे शासन पाहता महापालिकेत शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापता येणार नाही, असा अभिप्राय वकिलांनी दिल्याने महापालिकेतील प्रस्तावित आघाडीचा विषय बारगळला आहे. त्यास विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनीही सोमवारी दुजोरा दिला आणि आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे कारवाईचा प्रश्‍नच उरत नाही, असे सांगितले. 

यापूर्वीची सुनावणी झाली 7 जानेवारीला
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्याने महेश कोठे व मनोज शेजवाल यांचे, तसेच महापालिकेत बेकायदेशीर गट स्थापन केलेल्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर 7 जानेवारी रोजी सुनावणी होती. मात्र, ती बेमुदत कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी जानेवारीअखेर होण्याची चर्चा होती, मात्र राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे हा विषय आता मागे पडला आहे. 

शहर शिवसेनेची होती मागणी 
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्या महापालिकेतील 19 नगरसेवकांना तत्कालीन शहरप्रमुख हरी चौगुले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. महापालिकेत शिवसेनेचे 21 नगरसेवक आहेत, त्यापैकी 19 जणांनी श्री. कोठे यांचा प्रचार केला होता, तथापि नोटीस बजावल्यानंतर सात नगरसेवकांनी आपण फक्त उमेदवारीचा निर्णय होईपर्यंत त्यांच्यासमवेत होतो, असा खुलासा केला आहे. त्यामुळे या नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

व्हीप बजावूनही...
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करू नये, असा व्हीप बजावण्यात आला. मात्र, तरीही विरोधात काम केले. सोलापूर विकास आघाडी सेना या गटाच्या स्थापनेसंदर्भात अर्ज देणे आणि शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध काम केल्याप्रकरणी श्री. कोठे व श्री. शेजवाल यांच्यासह देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, विठ्ठल कोटा, अमोल शिंदे, उमेश गायकवाड, कुमुद अंकाराम, मंदाकिनी पवार, सुमित्रा सामल व मीरा गुर्रम या 10 जणांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

अशा झाल्या घडामोडी
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने श्री. कोठे यांची उमेदवारी निश्‍चित होती. मात्र, ऐनवेळी कॉंग्रेसमधून  शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे श्री. कोठे यांनी बंडखोरी केली व निवडणूक लढवली. त्याचा फटका बसून शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी झाली आणि त्याचा फायदा होऊन कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या. धक्कादायक म्हणजे माने यांच्यापेक्षा कोठे यांना जास्त मते मिळाली. माने यांना 29 हजार 247 तर कोठे यांना 30 हजार 81 मते मिळाली. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर श्री. माने यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांवर कारवाईची मागणी श्रेष्ठींकडे करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्याकडूनही आजच्या घडीपर्यंत काही मागणी झाली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com