esakal | तुम्ही मोकळ्या अथवा जुन्या जागेत वाढीव बांधकाम केले आहे का? दीड लाख मालमत्तांचा होणार सर्व्हे

बोलून बातमी शोधा

Construction

शहरातील मोकळ्या जागांवर नव्याने झालेले बांधकाम, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी वाढलेले बांधकाम आणि मोकळ्या जागांवरील सर्वच इमारतींचा (मालमत्ता) सर्व्हे या महिन्यात केला जाणार आहे. 

तुम्ही मोकळ्या अथवा जुन्या जागेत वाढीव बांधकाम केले आहे का? दीड लाख मालमत्तांचा होणार सर्व्हे
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील मोकळ्या जागांवर नव्याने झालेले बांधकाम, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी वाढलेले बांधकाम आणि मोकळ्या जागांवरील सर्वच इमारतींचा (मालमत्ता) सर्व्हे या महिन्यात केला जाणार आहे. ज्या मोकळ्या जागांवर बांधकाम झाले असून त्याच्या ले-आउटमधील रस्ते, मोकळा भूखंड, ऍमेनिटी स्पेस महापालिकेकडे हस्तांतरित केला नाही, त्याची पडताळणी करून त्यांना नव्याने कर आकारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी स्वतंत्रपणे पाच आदेश काढले असून, त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. 

शहराचा विस्तार 180 चौरस किलोमीटर असून त्यावर अंदाजित साडेतीन लाखांहून अधिक मालमत्ता असतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. सध्या महापालिकेच्या रेकॉर्डनुसार शहरात एक लाख 32 हजार 821 रहिवासी तर 13 हजार 913 अनिवासी (राहण्यासाठी व व्यापारासाठी वापर) मालमत्ता आहेत. रहिवासी व अनिवासी मालमत्तांची संख्या 10 हजार 608 असून "गवसु'मध्ये 41 हजार मालमत्ता आहेत. अनेक मोकळ्या जागांवर मोठमोठ्या इमारती उभारल्या असून पूर्वीच्या लहान घरांच्या जागेतही इमारती उभारल्या आहेत. अनेक मालमत्तांचे हस्तांतरण झाले असून त्या ठिकाणीही नव्या इमारती झाल्या आहेत. मात्र, या सर्व बाबींची पडताळणी 20 वर्षांत एकदाही झाली नाही. 2016-17 मध्ये सायबर टेककडून दीड लाख मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे झाला. परंतु, करआकारणी नव्याने झाली नसून आता या सर्वच बाबींची पडताळणी करण्याबद्दलची कार्यपद्धती आयुक्‍तांनी निश्‍चित केली आहे. करसंकलन विभागाअंतर्गत त्याचे काम केले जाणार असून त्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून सर्वच विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली जाणार आहे. 

आदेशातील ठळक बाबी... 

  • एखाद्या इमारतीत एकापेक्षा अधिक वापराचे प्रकार अथवा वापरकर्ते असल्यास त्यांना आकारला जाईल स्वतंत्र कर (पार्किंग, जिना, लिफ्टरूम, पंपरूम इत्यादी.) 
  • व्यापारी अथवा औद्योगिक वापराच्या अथवा रहिवासी जागेचा वापर व्यापारासाठी होतो की नाही, याची पडताळणी करून होणार नव्याने करआकारणी 
  • बांधकाम पूर्ण झाल्याचे वर्ष निश्‍चित करून त्यावर करआकारणी निश्‍चित करावी; इमारतीवरील होर्डिंग्ज, जाहिरातीतून उत्पन्न मिळत असल्यास त्याची नोंद करून नवा कर आकारावा 
  • जमिनीचे ले-आउट केले असल्यास ज्या जमिनीवरील सर्व प्लॉटधारकांना स्वतंत्र कर आकारावा; रस्ते, मोकळ्या जागांचे हस्तांतरण महापालिकेकडे न झाल्यास त्याच्या जागा मालकाकडून कर वसूल करावा 
  • मोकळ्या जागेची नोंद असून त्यावर आता बांधकाम झाले आहे; त्याचा फोटो काढून त्यांना नव्याने आकारणी करावी 

आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली निश्‍चितपणे उत्पन्न वाढेल 
महापालिका क्षेत्रातील मालमत्तांची दर चार वर्षांनी पडताळणी होणे अपेक्षित असतानाही शहरातील मालमत्तांची पडताळणी मागील 15-20 वर्षांत एकदाही झाली नाही. तत्पूर्वी, शहरातील एक लाख 58 हजार मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे झाला असून आता त्याची पुन्हा पडताळणी होणार आहे. त्यानंतर झोननिहाय (पेठानिहाय) सर्वच मालमत्तांचा सर्व्हे करून करआकारणी नव्याने केली जाणार असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 
- जमीर लेंगरेकर, 
उपायुक्‍त, सोलापूर महापालिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल