Solapur News : माळशिरसमध्ये साकारणार ट्रामा केअर सेंटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News : माळशिरसमध्ये साकारणार ट्रामा केअर सेंटर

निमगाव : माळशिरस येथे रुग्णांच्या सेवेसाठी अद्यावत ट्रामा केअर सेंटर साकारले जाणार आहे. या संबंधीच्या मंजुरीचे पत्र आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आमदार राम सातपुते यांना दिले. या सेंटरमध्ये रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. सेंटर उभारणीसंदर्भातील आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सर्वात शेवटचा तालुका म्हणून माळशिरस तालुक्याचा उल्लेख होतो. याच तालुक्यातून ५ राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. ५ साखर कारखाने आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या व तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या माळशिरसमध्ये पुरेशा आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. विशेषत: अपघातग्रस्तांना वेळेत सुविधा मिळत नसल्याने अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले. शिवाय या शहरासह परिसरातील नागरिकांनादेखील आरोग्याच्या सुविधा मिळण्याला अडचणी आहेत.

या पार्श्वभूमीवर, आमदार राम सातपुते यांनी येथील ट्रामा सेंटर उभारणीला मंजुरी देण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्याकडे करुन त्यासाठी पाठपुरावा ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले. मंत्री सावंत यांनी या सेंटरच्या उभारणीसंदर्भातील ‘अ’ वर्गाचे आदेश पारीत केले आहेत. ट्रामा सेंटर मंजुरीमुळे नागरिकांच्यामधून समाधान व्यक्त केले जाणार आहे.

जखमींना तत्काळ सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी माळशिरसचे आ राम सातपुते यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना डॉ तानाजी सावंत यांना माळशिरस या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर व्हावे असे पत्र देऊन सतत पाठपुरवठा केल्याने माळशिरस मध्ये लवकरच सर्व सोयीने युक्त असे भव्य ट्रामा केअर सेंटर उभारले जाऊन अनेकांचे प्राण वाचणार आहेत आ. राम सातपुते यांनी दूरदृष्टी ठेवून केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

माळशिरसच्या ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर होणार असल्याने अपघातग्रस्त रुग्ण, रक्तदाब, किंवा इतर आजारांवर तत्काळ आरोग्याच्या सुविधा या ट्रामा केअर सेंटरमध्ये मिळणार असल्याने अनेकांचे प्राण तर वाचणार आहेतच, पण याचबरोबर या ट्रामा केअर सेंटरमध्ये अस्थिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, सर्जन, स्त्री रोग तज्ञ, भूलतज्ञ असे वेगवेगळे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झाल्याने सर्व प्रकारच्या डॉक्टरांकडून सर्व आजारावरचे उपचार होणार आहेत.

- आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष, माळशिरस नगरपंचायत

टॅग्स :SolapurMLA