esakal | solapur : पाऊस, करप्यामुळे कांद्याचा वांदा
sakal

बोलून बातमी शोधा

 पाऊस, करप्यामुळे कांद्याचा वांदा

सोलापूर : पाऊस, करप्यामुळे कांद्याचा वांदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राजाने मारलं व पावसाने झोडपलं तेथे कोणाचाही काही चालत नाही. सध्या अशीच अवस्था कांदा उत्पादकांची झाली आहे. करमाळा तालुक्‍यातील उत्तर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसभर ऊन तर रात्री जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे कांद्यावर करपा रोगाबरोबरच पाणी लागून कांदा अक्षरश: सडून गेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान झाले आहे.

करमाळा तालुक्‍यातील उत्तर भागात खरीप हंगामात इतर पिकाबरोबरच कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. काही शेतकरी पेरून तर काही शेतकरी रोपांची लागवड करतात. याहीवर्षी कांद्याला बाजारभाव चांगला मिळेल, या आशेवर कामोणे, पोथरे, आळजापूर या परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र दिवसा प्रखर ऊन व रात्री गारवा यामुळे कांद्यावर करपा रोग जास्त प्रमाणात झाला आहे. महागडी औषधांची फवारणी करूनही हा रोग आटोक्‍यात येत नाही.

हेही वाचा: Corona Update : राज्यातील रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ

अशातच गेली पंधरा दिवसापासून दररोजच पाऊस होत असल्याने कांद्याला पाणी लागून कांदा पिवळा पडून नासला आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून केलेली कांद्याची लागवड वाया जाऊन शेतकरी संकटात सापडला आहे.

पैसे नसतानाही शेतकऱ्यांनी उसनवारी करून हजारो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली आहे. मात्र, कांदा वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने संबंधितांना प्रत्यक्ष शेतात पाठवून पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे गरजेचे आहे.

- तुषार शिंदे, शेतकरी जातेगाव, ता. करमाळा

आमच्या चार एकर कांद्यापैकी दोन एकर कांदा पाण्याने सडला आहे. उर्वरित दोन एकरांवर करप्या रोगाने निम्म्याहून अधिक कांदा जळाला आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी.

- राम नलवडे, शेतकरी, कामोणे, ता. करमाळा

loading image
go to top