
माळशिरसला ८२ तर माढा, वैराग, नातेपुतेमध्ये ७७ टक्के मतदान
सोलापूर : पाच नगरपंचायतीसाठी शांततेत मतदान
सोलापूर : जिल्ह्यातील (solapur district)पाच नगरपंचायतीसाठी आज शांतते मतदान पार पडले. माळशिरस नगरपंचायतीसाठी सर्वाधिक ८२ टक्के तर माढा, वैराग, नातेपुते या नगरपंचायतीसाठी ७७ टक्के तर महाळूंग-श्रीपूरसाठी ७३.९४ मतदान झाले. दरम्यान १९ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने तोपर्यंत उमेदवारांना वाट पाहावी लागणार आहे.
नातेपुते नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक(election) होती. येथे शांततेत ७६.०२ टक्के मतदान झाले. येथील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे लक्ष वेधले होते. १३ प्रभागासाठी ८ हजार ३४७ (७६.२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माढा शहारात अंत्यत चुरशीने ७७.३५ टक्के मतदान झाले. माढा नगरपंचायतीच्या तेरा जागांसाठी ३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. वैराग नगरपंचायतीसाठी १३ प्रभागासाठी ७७.०४ टक्के मतदान झाले असून एकूण ११ हजार १०७ पैकी ८ हजार ५५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माळशिरस नगरपंचायतीसाठी सर्वाधिक ८२.४ टक्के मतदान झाले. महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५६.५१ मतदान झाले होते.