Cricket : ‘पार्क’वर टी-ट्वेंटीचा थरार; आठ संघ ३१ सामन्यांत भिडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

Cricket : ‘पार्क’वर टी-ट्वेंटीचा थरार; आठ संघ ३१ सामन्यांत भिडणार

सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (पार्क स्टेडियम) वर ‘एसपीएल’ (सोलापूर प्रिमियर लीग) महापौर चषक क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. एकूण आठ संघ ३१ सामने खेळणार आहेत. या एसपीएल महापौर चषक स्पर्धेत दहा लाख रुपयांची बक्षिसे असणार आहेत.

पार्क स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आल्यानंतर पहिलीच एसपीएल स्पर्धा या मैदानावर होत आहे. या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. एकूण आठ प्रायोजित संघ स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. यामध्ये मनोरमा मास्टर्स, बन्सल क्लासेस, आपटे टायगर्स, अजिंक्यतारा चॅलेंजर, माऊली वॉरिअर्स, आकांक्षा ईगल्स, स्वस्तिक किंग्ज, सहारा रायडर्स हे आठ संघ मैदानात उतरणार आहेत.

संघाचे लिलाव झाल्यानंतर आता संघासाठी युनिफॉर्म वितरित करण्यात आले. त्यानंतर सामन्याचे लॉट्‌स देखील काढण्यात आले आहेत. महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पर्धा सुरू करण्याची तारीख निश्चिती केली नसल्याने स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. तरीही क्रिकेट रसिकांना या स्पर्धेत एकूण ३१ सामन्यांचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

ठळक बाबी

एकूण टी-ट्वेंटी ३१ सामने दररोज होणार दोन सामने

आठ संघांचा सहभाग पहिले बक्षीस दोन लाख तर दुसरे एक लाख

प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघास १५ हजार रुपयांचे बक्षीस

उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षणासाठी बक्षिसे

सामनावीर व मालिकावीर बक्षिसे एकूण दहा लाख रुपयांची बक्षिसे