esakal | सोलापूर : ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो!
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो!

sakal_logo
By
शांतीलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव धरणक्षेत्र परिसरात सलग चार दिवस पावसाने दमदार बॅटिंग केल्याने मंगळवार (ता.8) रोजी सकाळी प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांचा आनंद मात्र द्विगुणित झाला आहे.

ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ४४७ द.ल.घ.फू.असून मृत साठा २.८० द.ल.घ.फू.इतका आहे.सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरून ओव्हर फ्लो होऊन निलकंठा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.आठ दिवसांपूर्वी मायनसमध्ये असलेला प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.धरणातील पाण्याचा लाभ ढाळेपिंपळगाव, महागाव, मळेगाव, बावी, तांदूळवाडी, साकत, पानगाव, कळंबवाडी, पिंपरी, काळेगाव, घाणेगाव, चिखर्डे या भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे.

हेही वाचा: मुंबई : पोलीसांनी वृद्धेला साडी, चोळी देऊन केले मुलांच्या हवाली

सलग दोन वर्षे धरण शंभर टक्के भरल्याने परिसरातील हजारो एकर बागायती क्षेत्र वाढले असून द्राक्षबागा, ऊसशेती, सीताफळ, पेरू, लिंबोणी तसेच इतर बागायती व जिरायती पिकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे.ढाळे पिंपळगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी फाउंडेशन,जलयुक्त शिवार यामध्ये तयार करण्यात आलेले बंधारे, सी.सी.टी, एलबेस, शेततळी पूर्णपणे भरली आहेत. सलग दुसऱ्या वर्षीही धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बळीराजा सुखावला आहे.

सलग दोन वर्षे धरण शंभर टक्के भरल्याने परिसरातील बागायती क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.धरणातील पाण्याचा ऊसशेतीला व इतर बागायती शेतीला मोठा फायदा होणार आहे.

- अशोक आगलावे, ऊस उत्पादक शेतकरी (बावी,ता.बार्शी)

धरण पूर्ण होऊन १२ वर्षे झाले तरीही ३० कि.मी.वर होणाऱ्या कॅनालचे काम मात्र अजूनही अपूर्णच आहे. धरणामध्ये पाणी असूनही कॅनॉल क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ भेटत नाही.

- वसुदेव मोरे, शेतकरी साकत,ता.बार्शी

loading image
go to top