सोलापूर : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक खरेदी

सोलापूर : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक खरेदी

सोलापूर : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारपेठेत सोने, चांदी, प्लॅाट, फ्लॅट, हिऱ्याचे दागिने, दुचाक्या व चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. सोन्याचे भाव अचानक दीड हजार रुपये प्रतितोळा घसरल्याने ग्राहकांना एकप्रकारे बोनस मिळाला, त्यामुळे सोने बाजारातील ग्राहकीत जबरदस्त वाढ झाली.

सकाळपासूनच बाजारातील विविध दुकानांवर गर्दी झाली होती. सोन्या- चांदीच्या दुकानात टेम्पल म्हणजे पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा जादा ओढा होता. ऊन वाढण्याच्या आधी दुकान, शोरूम व प्रोजेक्टच्या ठिकाणी ग्राहक खरेदीसाठी हजर झालेले होते.

मागील आठवड्यात सोन्याचे भाव ५३ हजारांपर्यंत पोचलेले होते. ते ऐन अक्षय तृतीयेला अचानक दीड हजार रुपयांनी कमी झाले. यामुळे बाजारात उत्साहाला उधाण आलेले होते. सोन्या- चांदीच्या दुकानात आज दिवसभर खरेदीसाठी ग्राहक थांबलेले होते. अक्षय तृतीयेला काही ना काही सोने खरेदी करावी, अशी परंपरा असल्याने सोने खरेदीला मोठे महत्त्व असते. त्यामुळे शहरातील सोन्या- चांदीच्या दुकानांत खरेदीची कामे सुरू होती. पारंपरिक दागिने, हिरे लावलेले सोन्याचे दागिने, नेकलेस, बांगड्या आदी सर्व प्रकारच्या दागिन्यांची खरेदी केली गेली. सर्वात जास्त अंगठीला (वेढणी) मागणी होती. याशिवाय चांदीच्या भावात आठ हजार रुपये प्रतिकिलो दर कमी झाले. बाजारात दिवसभरात सहा ते सात कोटींची उलाढाल झाली.

शहरातील इलेक्ट्रॅानिक्स दुकानांवर फ्रीज, कपाट, टीव्ही, मोबाईल, एसी यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. दिवसभर दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. अनेक अप्लायन्सेसची खरेदी केली जात होती. या बाजारात देखील करोडो रुपयांची उलाढाल झाली.

शहरातील टू-व्हीलर व फोर-व्हीलर वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी वाहने खरेदी केली. बहुतांश लोकांनी अगोदर बुकिंग करून आजच्या मुहूर्तावर वाहने घरी नेली. तर काही ग्राहकांनी आजच्या मुहूर्तावर बुकिंग केले. टू-व्हीलरची सर्वांत जास्त बुकिंग होती. फायनान्स कंपन्या व बॅंकांनी मोठ्या प्रमाणात वित्तीय सहाय्य उपलब्ध केल्याने खरेदीच्या उत्साहात भर पडली. या वित्तीय संस्थांनी प्रोसेस फीवर सवलती दिल्या होत्या. याशिवाय वाहन कंपन्यांनी देखील खरेदीवर सवलती जाहीर केल्या होत्या.

शहर व परिसरात बिल्डर्सकडून फ्लॅट खरेदीसाठी देखील व्यवहार केले गेले. या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील शंभरपेक्षा अधिक फ्लॅटची विक्री झाली आहे. तसेच प्लॉटचे व्यवहार त्याहीपेक्षा अधिक झाले आहेत. याशिवाय काही जणांनी आजच्या मुहूर्तावर बुकिंग केली तर काहींनी रेडी पझेशनचे फ्लॅट खरेदी केले. या उलाढालीचा आकडा देखील खूप मोठा आहे.

ठळक

  • सोन्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत दीड हजार रुपयांनी घसरले

  • सोने खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा

  • बॅंका व वित्तीय संस्थांकडून वाहन खरेदीसाठी कर्ज सवलती

  • शहरात १०० पेक्षा अधिक फ्लॅटची विक्री

  • इलेक्ट्रॉनिक्स बाजारात लाखोंची उलाढाल

जिल्हाभरात १५०० दुचाकींची खरेदी झाली. तसेच चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. वाहन बाजारपेठेत दहा कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. पाडव्यानंतर ग्राहकांचा अक्षय तृतीयेलाही चांगला प्रतिसाद आहे.

- बाबू चव्हाण, विश्वस्त, जिल्हा अॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशन, सोलापूर

अचानक सोन्याचे भाव दीड हजार रुपयांनी कमी झाल्याने बाजारात ग्राहकी वाढली. सर्वात जास्त खरेदी सोन्याच्या अंगठीची केली गेली. चांदीचे दर देखील आठ हजार रुपये किलोने कमी झाले आहेत.

- सिद्राम शिनगारे,राज्य उपाध्यक्ष, सराफा असोसिएशन, सोलापूर

Web Title: Solapur Record Breaking Purchase Occasion Akshay

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top