सोलापूर : पेहे येथील शेतकऱ्यांना तब्बल ३९ कोटींचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Penalty

सोलापूर : पेहे येथील शेतकऱ्यांना तब्बल ३९ कोटींचा दंड

पंढरपूर: विना परवाना सुमारे ४० हजार ९९३ ब्रास इतक्या दगड आणि मुरुमाचे उत्खनन करुन परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पेहे (ता. पंढरपूर) येथील २२ शेतकऱ्यांना महसूल विभागाने सुमारे २९ कोटी आठ लाख ७०० रुपये दंड केला आहे. दंडाची रक्कम सात दिवसात भरावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर महसूल विभागाची थकबाकी म्हणून बोजा चढवण्यात येईल, अशा नोटीस देण्यात आल्या आहेत. महसूल विभागाच्या नोटीसनंतर येथील शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदेशीर दगड आणि मुरुम उत्खननप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे तक्रारी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पेहे येथे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून बेकायदेशीर दगडाचे उत्खनन करुन तो खडीक्रशरसाठी वापरण्यात आला होता. तर मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आला होता. याप्रकरणी दाखल केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जावून पंचनामे केले होते. त्यावेळी सुमारे ४० हजार ९९३ ब्रास दगड आणि मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर महसूल विभागाने कारवाई करत शेतकऱ्यांना दणका दिला आहे.

दरम्यान, दंड वसुल करावा अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केली आहे. त्यानंतर पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी पाच एप्रिल रोजी पुन्हा संबंधित २२ शेतकऱ्यांना दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत भरावी, अन्यथा जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. येथील शेतकऱ्यांना दंडाच्या नोटीस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Solapur Revenue Department Farmers Pehe Fined Rs 39 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top