Solpaur: वाहनधारकांकडे ८ कोटीचा दंड थकित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic-police

सोलापूर : वाहनधारकांकडे ८ कोटीचा दंड थकित

सोलापूर : रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आता ऑनलाईन पद्धतीने दिले जाते सन २०१९ पासून सुरू झालेल्या ऑनलाइन चलन पद्धतीने दिलेल्या दंडाची आठ कोटी रुपयांची रक्कम शहरातील वाहनचालकांकडून थकीत आहे. या वसुलीसाठी वाहतूक शाखेने विशेष नाकाबंदी मोहीम सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली

वाहतूक विभाग अद्ययावत करण्यासाठी २०१९ मध्ये वाहतूक पोलिसांकडे ‘एम स्वॅप’ मशीन देण्यात आलेल्या आहेत. त्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटचा फोटो काढून वाहतूक शाखेच्या सिस्टीममध्ये अपलोड केला जातो. यानंतर संबंधित वाहन चालकांच्या नावावर ऑनलाईन दंड पडतो. आकरण्यात आलेला दंड जागेवरच भरला नाही तरी वाहन जप्त न करता सोडून देण्यात येते. पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत वाहन चालकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर दंडाची पावती पाठवली जाते.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

वाहन चालकाने जागेवर दंड भरणे अपेक्षित आहे. परंतु अनेक वेळा नो पार्कींगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचे फोटो पोलिस घेतात. यावेळी दंड भरण्यासाठी वाहनचालक तेथे हजर नसतात. तसेच ट्रिपल सीट असलेले वाहन चालक धूम ठोकून पळून जातात. परंतु पोलीसांकडे फोटो असल्यामुळे ऑनलाइन दंड आकारण्यात येतो. या अद्ययावत यंत्रणेमुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस व वाहनचालक यांच्यात होणारे वाद हे प्रकार आता थांबले आहेत. वाद घालणाऱ्या वाहनचालकांना पोलिस काही न बोलता केवळ नंबर प्लेटचा फोटो काढून दंड आकारत असतात. परंतु ऑनलाइन दंड भरण्यासाठी वाहनचालक उदासीन असल्याचे मागील दोन वर्षात दिसून आले आहे.

दंड ठोठावलेली अनेक वाहने दंड न भारताच सर्रासपणे रस्त्यावर फिरत आहेत. आपल्या वाहनावर दंड आहे याची माहिती काही वाहनचालकांना नाही. आता पोलिस विशेष मोहीम राबवत आहेत. यात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये नंबरप्लेट स्कॅन केल्यानंतर वाहनांची माहिती उपलब्ध होणार आहे. वाहनांवर दंड असेल त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याचे यावेळी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

पत्ता, मोबाईल नंबर बदलल्याने अडचण

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी असलेला मोबाईल क्रमांक व पत्ता यावर ऑनलाइन दंडाची माहिती पाठवली जाते. यात मोबाईल बंद असणे, पत्ता बदलेला असल्यास चालकांपर्यंत थकबाकीची माहिती पोहोचत नाही. परिणामी थकबाकीची रक्कम वाढत आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, यातून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षात सुमारे ८ कोटी रुपयांची दंड वसुली बाकी आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जाणार आहे. त्यात ज्यांच्याकडे दंड थकीत आहे अशा वाहनचालकांकडून दंडाची रक्‍कम वसूल केली जाणार आहे.

- बाळकृष्ण हनपुडे- पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक, सोलापूर

loading image
go to top