
Solapur : सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागले सर्वच पक्षांचे डोळे
सांगोला : सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी शेकाप विरोधात आजी-माजी आमदार एकत्र निवडणूक लढविणार की सूतगिरण, खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगोला विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात पक्षापेक्षा नेत्याच्या गटावरच निवडणुकीचे प्राबल्य जाणवत आहे. बराच काळ स्थगित झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे पडघम सध्या वाजू लागले आहे. या अगोदर सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरण व खरेदी विक्री संघाची निवडणूक सर्वच पक्षांच्या सहमतीने बिनविरोध झाली होती.
सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने निवडणूक बिनविरोध केली असली तरी आपले प्राबल्य ठेवले आहे. परंतु सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथील प्रत्येक आठवड्याला होणारा जनावरांचा मोठा बाजार व इतर व्यवसायातून मोठी उलाढाल ही होत असते. त्यामुळे या निवडणुकीवर सर्वच पक्षांचा डोळा लागून राहिला आहे.
गेल्या दोन सहकारी संस्था बिनविरोध झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक बिनविरोध होणार का ? याकडे नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचे जास्त लक्ष लागून राहिले आहे. सद्यस्थितीत पक्षापेक्षा आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील या दोघांनी निवडणुका एकत्रितच लढवायचे ठरवले असल्याने ही निवडणूक बिनविरोध नाही झाली तरी निश्चितपणे हे दोन्ही गट एकत्रित निवडणूक लढवतील.
या संस्थेत शेकापचे वर्चस्व असल्याने शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीमध्ये कशी रणनीती आखतो, कोणाला संधी देतो की बिनविरोध लढवण्यासाठी इतर पक्षांच्या हातात हात घालतो हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील मतदार -
सोसायटी मतदारसंघ १०४९, ग्रामपंचायत मतदारसंघ ८३३, व्यापारी मतदारसंघ २५४, हमाल मतदारसंघ ४७ असे २१८३ मतदार आहेत.
निवडणूक कार्यक्रम -
२७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ५ एप्रिलला होणार आहे. ६ ते २० एप्रिल या काळात उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ मार्च रोजी पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे, तर २८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
शेकाप विरोधात आजी-माजी आमदार एकत्रित लढणार ? -
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध करावयाचे झाल्यास जागा वाटपाचा तिडा लवकर सुटणारा नाही. प्रत्येक जण आपले संचालक जास्त येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु ही निवडणूक जर बिनविरोध झाली नाही तर सत्ताधारी शेकाप विरोधात पक्षापेक्षा शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील गट एकत्र येऊन निवडणूक लढतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे.