Solapur : राज्याच्या आरोग्य उपसंचालकाकडून सांगोला ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Sangola Rural Hospital inspection

Solapur : राज्याच्या आरोग्य उपसंचालकाकडून सांगोला ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती

सांगोला : सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील अपघातानंतर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांचा कार्यभार काढून घेतल्यानंतर लगेचच शुक्रवार (ता. 4) रोजी आरोग्य विभागाचे राज्याचे उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेची चांगलीच झाडाझडती केली. दवाखान्यातील प्रत्येक विभागात जाऊन तसेच दवाखाना परिसर, 108 ॲम्बुलन्सचीही पाहणी केली व उपस्थित अधिकारी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

जुनोनी (ता. सांगोला) येथे वारकऱ्यांच्या पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सात जण ठार तर पाच जण जखमी झाले होते. या अपघातातील जखमींना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दवाखान्यात ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांनीही रुग्णालयात दांडी मारल्याने आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली होती.

तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तासाभरानंतर रुग्णालयात आले होते. या प्रकरणाची दखल घेऊन आरोग्य विभागाने तात्काळ वैद्यकीय अधीक्षक यांचा कार्यभार काढून घेतला आहे. शुक्रवार (ता. 4) रोजी अचानक आरोग्य विभागाचे राज्याचे उपसंचालक रामचंद्र हंकारे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली.

उपस्थित वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. आपल्या कामकाजात सुधारणा न आढळल्यास पुढील काळात कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही शेवटी राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आरोग्य सेवा करा -

आरोग्य सेवा करत असताना नैतिकता व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काम करावे. ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या वेळेत रुग्णालयात पूर्णवेळ हजर राहावे. उर्वरित वेळेतही त्यांनी परिसरातच असणे आवश्यक आहे. यापुढील काळात सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराविषयी सुधारण्याची अपेक्षा आहे.

कामकाजात सुधारणा न झाल्यास किंवा यापुढे कार्यात कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. डॉक्टरांनी मानवतेच्या दृष्टिकोन ठेवून आरोग्यसेवा केली पाहिजे असे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

आधिकारी, कर्मचारी उपस्थित व परिसरही झाला स्वच्छ -

जुनोनी अपघातानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यातच कार्तिकी एकादशीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री व इतर अधिकारी पंढरपूरला आले होते. या अपघातानंतर कोणीतरी आधिकारी, मंत्री निश्चितपणे रुग्णालयाला भेट देतील यामुळे सर्वजण अलर्ट होते. दोन दिवस झाले रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपस्थित होत असून परिसराची स्वच्छताही दिसून आली.

टॅग्स :SolapurHospitalsangola