Solapur : सरपंच भाभी सापडेना; कारभार उपसरपंचांकडे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahila Raj

Solapur : सरपंच भाभी सापडेना; कारभार उपसरपंचांकडे?

सोलापूर : कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंच भाभी जैतुनबी शेख या ७ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. त्या स्वत:हून बेपत्ता झाल्या की कोणी घातपात केला, याचा ठावठिकाणा अद्याप शहर पोलिसांना लागलेला नाही. १३ दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याने आता गावचा कारभार ग्रामपंचायत अधिनियमानुसार उपसरपंचांकडे दिला जाईल, अशी माहिती उत्तर सोलापूर पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारी (ता. ७) भरदुपारी साडेबाराच्या सुमारास पावणेपाच वर्षे गावचा कारभार हाकलेली महिला सरपंच बेपत्ता होते आणि त्यांच्या कुटुंबियांसह गावातील कोणालाच काहीही माहिती होत नाही, ही बाब पोलिसांना पण विचार करायला लावणारी आहे. सलगर वस्ती पोलिसांनी गावातील जवळपास १०० लोकांकडे सरपंच भाभीबद्दल विचारपूस केली. त्यावेळी ‘भाभी अच्छी थी, उनका किसीसे कोई झगडा नही था’ हेच उत्तर पोलिसांना सातत्याने ऐकायला मिळाले. परंतु, सर्वांसोबत चांगले संबंध असणारी भाभी गाव तथा गावचा कारभार सोडून गेली कुठे, याचा शोध पोलिसांना आव्हानात्मक झाला आहे.

सरपंच भाभीच्या कुटुंबियांसह गावातील एकूण १२ जणांचे जबाब सुध्दा पोलिसांनी घेतले. पण, पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलाच नाही. एका गावची सरपंच महिला भर दुपारी गावच्या शिवारातून बेपत्ता होते आणि १३ दिवस होऊनही पोलिसांना त्यांचा शोध लागत नाही, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान, सरपंच भाभीचा कालावधी साधारणत: तीन-चार महिन्यांपर्यंतच आहे. गावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना प्रशासकीय अडचणी येत असल्याने पुढील आठवड्यातील मासिक सभेत उपसरपंचाकडे गावचा कारभार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Solapur Sarpanch Bhabhi Administration Deputy Sarpanches

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..