esakal | Solapur: शेतकऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र बंद’ ठेवा : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

 शरद पवार

शेतकऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र बंद’ ठेवा : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उत्तर प्रदेशात शांततेने निघालेल्या शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.११) भाजप विरोधी पक्षांच्यावतीने महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा हातात न घेता शांतपणे आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे. त्या दिवशी दुकाने बंद ठेवा, रस्त्यावर रहदारी करू नका. देशातील शेतकऱ्यांच्या वाट्याला कोणीही गेले तर या देशातील माणूस गप्प बसणार नाही, असा संदेशच या बंदमधून केंद्राला द्यायचा असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात शुक्रवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, उत्तर प्रदेशातील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारची भूमिका ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रमुख पक्षांची एक बैठक झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे : विद्यमान २७ नगरसेवकांचे भवितव्य अस्पष्ट

उत्तर प्रदेशातील या घटनेची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यामुळे आयकर विभागाने आमच्या निकटवर्तीयांवर छापेमारी सुरु केल्याची माहिती दिल्लीतील सत्ताधारी पक्षातील एकाने आपल्याला सांगितली असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मांडले म्हणून घरावर छापेमारी केली जात आहे. ही छापेमारी चुकीची आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे येथील जनता काहीही एक सहन करणार नसल्याचेही पवार यांनी सांगितले.

गुजरातला मदत केली, महाराष्ट्राला नाही

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मी केंद्रात मंत्री होतो. त्यावेळी गुजरातमधील भाजप सरकारचे काही मंत्री माझ्याकडे यायचे. मी त्यांचे प्रश्‍न त्यावेळी केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून सोडवून देतो होतो. भाजप सरकारला मदत करू नका पण गुजरातमधील जनतेशी आमचे भांडण नसल्याचे त्यावेळी मी सांगत होतो. आज मात्र महाराष्ट्रात वेगळ्या विचाराचे सरकार आणि केंद्रात वेगळ्या विचाराचे सरकार आहे. महाराष्ट्र सरकारला दिल्लीवरून रोज त्रास दिला जातो. केंद्रातून अनेक गोष्टींचे महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मिळत नाहीत. केंद्र सरकार अनेक गोष्टींवर कर वसूल करते, परंतु महाराष्ट्राचा वाटा दिला जात नसल्याचेही पवार यांनी सांगितले.

loading image
go to top