Solapur : शिवाजी चौक ते सुपर मार्केट उड्डाणपूल निवाडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flyover

Solapur News: शिवाजी चौक ते सुपर मार्केट उड्डाणपूल निवाडा

सोलापूर : जुना पूना नाका ते पत्रकार भवन या फेज एकमधील उड्डाणपूल मार्गातील पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात शिवाजी चौक ते नवीवेस पोलिस चाैकी ते सुपर मार्केट या मार्गावरील ३० मिळकतींच्या निवाड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंगळवारी (ता. २२) सादर करण्यात आला. तर भूसंपादनाच्या वाढीव ३८ कोटी निधीचा प्रस्ताव आता नूतन आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

जुना पूना नाका ते पत्रकार भवन या फेज एकमधील उड्डाणपुलाची लांबी ही ५.५ किलोमीटर इतकी आहे. रेडिरेकनर दरानुसार नऊ झोन करण्यात आले आहेत. त्यापैकी जुना पूना नाका ते शिवाजी चौक या पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटर अंतरामधील ३१ मिळकतींची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निवाड्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात शिवाजी चौक ते नवीवेस पोलिस ते सुपर मार्केट या मार्गावरील ३० बाधित मिळकतींच्या निवाड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंगळवारी सादर करण्यात आला. शासकीय जागांना नियमानुसार टीडीआर आणि आरसीसी देता येत नाही. त्यामुळे यावर मंत्रालय स्तरावर बैठक होणार आहे. तत्पूर्वी, भूसंपादन विभागाने खासगीसह शासकीय जागांचे मूल्यांकन काढले असून, भूसंपादनाची रक्कम ११७ कोटींवरून १५५ कोटींवर गेली आहे. या भूसंपादनापोटी महापालिका ३० टक्के आणि राज्य शासनाने ७० टक्के हिस्सा द्यावयाचा आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने मुफ्रा कंपनीकडून ३५ कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेने भूसंपादनापोटी काढले होते. आता भूसंपादनाची रक्कम ३८ कोटींनी वाढल्याने महापालिकेला वाढीव ११ कोटींचा निधी कर्ज स्वरूपात अथवा इतर माध्यमातून उभा करावा लागणार आहे. महापालिका वाढीव निधी कशा पद्धतीने उभा करणार, याबाबतच्या विस्तृत माहितीसह प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागणार आहे. तो प्रस्ताव आता आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

शासकीय जागा वगळून निवाडा

फेज वनमध्ये रेल्वे, पोस्ट, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळाची जागा आहे. या शासकीय जागांबाबत शासन स्तरावर निर्णय होणार आहे. दरम्यान, खासगी मिळकतींच्या झालेल्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करून निवाडा जाहीर करण्यासाठी नऊ टप्प्यांत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवावा लागणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शासकीय जागा वगळून खासगी जागांचा निवाडा जाहीर करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यात पाठविण्यात आलेल्या ३१ मिळकतींची निवाडा फाइल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बुधवारी प्राप्त होईल. तत्पूर्वी दुसऱ्या टप्प्यातील ३० मिळकतींच्या निवाड्यासाठी मंगळवारी अहवाल पाठविला आहे. सध्या तरी शासकीय जागांविषयी निर्णय झाला नसल्याने शासकीय जागा वगळून निवाडा जाहीर करण्यात येईल.

- केशव जोशी, भूसंपादन अधिकारी