मंगळवेढा : आमदार आवताडेंना दे धक्का ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samadhan Awtade

मंगळवेढा : आमदार आवताडेंना दे धक्का !

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला धक्का बसला असून भाजप आमदार समाधान आवताडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांच्याच विरोधी गटातून भाजपचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष विजयी झाले आहेत. या निवडणुकीत समविचारी गटाने २० जागांवर दणदणीत विजय मिळविला असून सत्ताधारी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

आज सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात पावसाने हजेरी लागल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी मतमोजणीकडे पाठ फिरवली होती. पण पावसाच्या उघडीप दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दामाजी कारखान्याची यंदाची निवडणूक सुरुवातीपासूनच रंगतदार ठरत गेले होती. सलग तीन वर्ष ऊसपुरवठा केला नसल्याच्या कारणावरून घेतलेल्या हरकतीत समविचारी गटाचे जवळपास ३६ मातब्बर उमेदवार बाद ठरले. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सत्ताधारी गटाचे अशोक केदार हे बिनविरोध निवडले गेले.

निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत होते. मात्र सत्ताधाऱ्यांपुढे समविचारी गटाने कडवे आव्हान निर्माण केले. अंतिम टप्प्यात सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे सिद्धेशर आवताडे संस्था मतदारसंघातून १४५ मतांनी विजयी झाले. पहिल्या फेरीत सत्ताधारी गटांचा बालेकिल्ला असलेल्या मंगळवेढा ऊस उत्पादक गटात त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत तर दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही त्यात वाढ झाली नाही.

विजयी उमेदवार

मंगळवेढा गट मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गट ः राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, मरवडे ऊस उत्पादक गट : शिवानंद पाटील, रेवणसिद्ध लिगाडे, औदुंबर वाडदेकर, भोसे ऊस उत्पादक गट : भिवा दौलतोडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, आंधळगाव ऊस उत्पादक गट : प्रकाश भिवाजी पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, संस्था मतदार संघ : सिद्धेश्र्वर आवताडे, महिला राखीव : निर्मला काकडे, लता कोळेकर, मागासवर्गीय मतदार संघ ः तानाजी कांबळे, इतर मागासवर्गीय मतदार संघ ः अशोक केदार, भटक्या विमुक्त जाती मतदार संघ : तानाजी खरात.

भाजपमध्ये बंड

दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेत ज्याप्रमाणे शिवसेनेत बंड झाले. त्याप्रमाणे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपत बंड होऊन भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी समविचारीच्या रूपाने भाजपचे आमदार समाधान आवताडेंना आव्हान देत विजयी मिळविला आहे.

दामाजी कारखाना वाचविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक सभासदांनी हातात घेतली होती. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप न करणे, कामगारांच्या पगारी न देणे या सर्वच बाजूंनी सत्ताधाऱ्यावर रोष होता. तो रोष मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला.

- शिवानंद पाटील, समविचारी आघाडी प्रमुख

Web Title: Solapur Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory Election Mla Avtade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top