सोलापूर : गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक संतापले, सिद्धेश्वर मंदिरातील फरशीची पुरातत्व विभागाकडून तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सिद्धेश्वर मंदिर

सोलापूर : गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक संतापले, सिद्धेश्वर मंदिरातील फरशीची पुरातत्व विभागाकडून तोडफोड

ब्रह्मपुरी (सोलापूर) : पुरातत्त्व विभाग आणि माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिराचे भाविक यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची शक्यता आहे. सिद्धेश्वर मंदिरातील गणपती मूर्तीच्या आजूबाजूस एका भाविकांने स्वखर्चाने लावलेल्या स्टाईल फरशीची ऐन गणेश चतुर्थी दिवशी पुरातत्त्व खात्याने क्रूरतेने तोडफोड करून उखडून टाकली आहे. पुरातत्त्व विभागाच्या या मनमानी कारभाराविरोधात भाविकांसह सर्व थरांतून संताप व्यक्त केला जातो आहे.

महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे मंदिर विकासापासून कोसो दूर आहे . त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधा ही मिळत नाहीत. पुरातत्त्व विभाग स्वत: काहीही करत नाही आणि दुसऱ्यालाही काही करू देत नाही, अशी भाविक भक्तांची भावना आहे. मंदिर परिसरातील भिंतीची डागडुजी करणे गरजेचे असताना याकडे

पुरातत्त्व विभाग खात्याचे अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे.उलट विकासकामांना खीळ बसवून विरोध करण्याची ताठर भूमिकाच पुरातत्त्व विभाग करीत असल्याचे दिसत आले आहे. ब्रह्मपुरी, माचनुर सह पंचक्रोशीतील सरपंच,ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. सिद्धेश्वर मंदीराच्या विकास कामात पुरातत्त्व खात्याचा मोठा अडसर आहे. एकतर पुरातत्व खाते स्वतःहुन विकास कामे करत नाही तसेच कोणी भाविक भक्त स्वखर्चाने करीत असेल तर त्याची तोडफोड केली जात आहे त्यामुळे भाविकांत कमालीचा संताप आहे.

सिद्धेश्वर मंदिरात असणाऱ्या गणपती मूर्ती शेजारी ओबडधोबड असल्याने एका भाविकांने सूंदर अशी स्टाइल फरशी केली होती मात्र याबाबत पुजाऱ्याला व भाविकाला काढून टाकण्याची नोटीसही दिली नाही. शेवटी गणेश चतुर्थीदिवशी त्या मंदिरातील मूर्तीच्या आजूबाजूला लावलेली फरशी हतोड्याने फोडून काढून टाकण्याची पुरातत्त्व खात्याची मजल गेली. आमच्या परवानगी शिवाय कोणी काही करायचे नाही ही अशी अडमुठी भूमिका घेणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने गुन्हा दाखल करावा , तसेच पुराततत्त्व विभागाने काढलेली फरशी पुन्हा त्या जागी बसवावी, अशी मागणी सरपंच मनोज पुजारी, सुनील डोके, विलास डोके,विठ्ठल डोके, आण्णासाहेब पुजारी यांनी केली आहे.पुरातत्त्व विभागाच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे भाविक आणि पुरातत्त्व विभाग असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे

दरम्यान हा वाद पोलीस ठाण्यापर्यत पोहचला त्यावेळी पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी सर्व गावकऱ्यांना शांत करीत पुरातत्व विभाग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बैठक घेऊन हा वाद मिटवण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणताही लेखी आदेश नसताना जाणीवपूर्वक गणेश चतुर्थी दिवशी गणपती मंदिरात तोडफोड करून हजारो भाविकांच्या भावना दुखावल्या आहे जो पर्यत संबंधित पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

सुनील डोके, मनोज पुजारी ग्रामस्थ.

आम्ही ही फारशी काढण्यासाठी संबंधितांना नोटीस दिली होती मात्र त्यांनी न काढल्यामुळे आम्ही बुधवारी फरशी काढली.

श्री करचे , पुरातत्व विभाग

Web Title: Solapur Siddheshwar Temple Ganesh Chaturthi Devotees Angry Vandalized Archeology Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..