Solapur News : कुंभार कुटुंबीयांकडून ५६ मातीच्या घागरी आंदण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News: कुंभार कुटुंबीयांकडून ५६ मातीच्या घागरी आंदण

सोलापूर : हलगी, तुतारी, संबळ या पारंपरिक वाद्यांच्या निनादात बोला बोला एकदा भक्तलिंग बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषात परंपरेप्रमाणे तैलाभिषेक व अक्षतासोहळ्यामधील विविध धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या मातीच्या घागऱ्या कुंभार कन्येच्या कुटुंबीयांकडून आंदण म्हणून हिरेहब्बू कुटुंबांकडे ५६ मातीच्या घागरी देण्यात आल्या.

सिद्धेश्वर यात्रेतील एक धार्मिक विधी म्हणजे कुंभार-म्हेत्रे यांच्याकडून हिरेहब्बूंना ५६ मातीच्या घागरींचे आंदण दिले जाते. बुधवारी कुंभार वाड्यात सकाळी ९ वाजता गणपती व सिद्धरामेश्वरांचे पूजन करून कुंभार वाड्यात मानाचे पाच दिवसांचे दिवे बसविण्यात आले.

प्रातिनिधीक स्वरूपात ११ घागरींची हार घालून पूजा करण्यात आली. कुंभार वाड्यातील पुरुष मंडळींसह सुहासिनींच्या हस्ते हिरेहब्बू वाड्यात सुपूर्द करण्यात आले.

यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे योगीराज म्हेत्रे - कुंभार यांनी मातीच्या घागरी सुपूर्द केल्या. या धार्मिक विधीने कुंभार वाड्यात यात्रेची लगबग सुरू झाली.

यावेळी मल्लिकार्जुन कुंभार, भीमाशंकर म्हेत्रे, महादेव म्हेत्रे कुंभार, रेवणसिद्ध कुंभार, संगण्णा म्हेत्रे कुंभार, नागनाथ कुंभार, सुरेश म्हेत्रे कुंभार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यासाठी वापरतात मातीच्या घागरी

तैलाभिषेक सोहळ्यात आणि अक्षता सोहळ्यात मातीच्या घागरींना विशेष मान आहे. कुंभार कन्येच्या कुटुंबीयांकडून आंदण म्हणून ५६ घागरी देण्याची परंपरा आहे.

ती आजपर्यंत कायम आहे. ६८ लिंगाच्या मिरवणुकीत भक्तांकडून देण्यात येणारे तेल या मातीच्या घागरीतच साठविले जाते. त्याच तेलाने ६८ लिंगाचा तैलाभिषेक सोहळा होतो.

तसेच अक्षतासोहळ्यात होणारी सुगडी पूजा, गंगापूजा आदी धार्मिक विधीसाठी या मातीच्या घागरींचाच वापर केला जातो.